समर्पण भावनेतून गाडगेबाबा – सानेगुरुजींनी महाराष्ट्रात सेवाभाव रुजवला ‘ : डॉ . सुनील शिंदे

———————————————–
अकोले प्रतिनिधी
‘ सेवेतला धर्म हाच खरा धर्म असून जो ओढूनताणून नाही निर्माण करता येत . महाराष्ट्रात संत गाडगेबाबा , सानेगुरुजी आणि सेनापती बापटांनी सेवाभाव रुजवला . सेवाभाव हाच सत्यधर्म आहे . ‘ असे प्रतिपादन डॉ . सुनील शिंदे यांनी केले .
अगस्ती महाविद्यालयाच्या वतीने नवलेवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ . भास्कर शेळके होते .
विद्यार्थी आणि सेवाभावनेचे मोल समजावताना डॉ . शिंदे पुढे म्हणाले , ‘ श्रमशिबीरे आणि शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून तरुण वयातच श्रमाचा वारसा थोरामोठ्यांच्या अनुकरणातून शिकावा लागतो . पाखरांच्या विश्वातून आणि प्राण्यांच्या जगण्यातूनही नकळत हा सेवाधर्म माणसाने शिकायला हवा , निसर्गकन्या बहिणाईने ‘ पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा ‘ किंवा ‘ पाहुनरे माणसाचे येवहार खोटेनाटे , बोरीबाभळीचे अंगावर आले काटे ‘ अशी संस्कार तसेच परिश्रमाची शिकवण मार्मिकपणे आपल्या खानदेशी गाण्यांतून दिली . संत ज्ञानोबा – तुकोबांपासून तर गांधी – विनोबांपर्यंत हा अनमोल वारसा लाभला आहे . ‘
प्राचार्य डॉ . भास्कर शेळके यांनी समाजकारण – राजकारणापर्यंत श्रमसामर्थ्याची देण पोचायला हवी हा विचार मांडताना संत मंडळींच्या शिकवणूकीतून प्राप्त झालेल्या विचारांचे दाखले अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले . याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा . चांगदेव डोंगरे , राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा . व्ही . एन् . निमसे , कार्यक्रम अधिकारी प्रा . गुलाब देशमुख , प्रा . वसंत पवार , प्रा . आवारी , प्रा . श्रीमती आर . एन् . रासने , प्रा . श्रीमती एन. बी . डफाळ आणि विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते .
———————————————-