नाशिक रोटरी क्लब तर्फे अवयवदान प्रबोधन परिसंवाद!

परिसंवादाचा शुभारंभ दिपप्रज्वलाने रोटरी डिस्ट्रिक्ट ग्व्हर्नर राजिंदर खुराना, शितल शहा,एनक्लेव्ह चेअर अवतारसिंह,विस्डम हायस्कूल च्या संचालक रितू अग्रवाल ,ओमप्रकाश रावत हायांच्या शुभहस्ते करण्यात आला
रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष ओमप्रकाश रावत ह्यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले की अवयवदाना जागरूकते साठी रोटरी क्लब ऑफ नाशिक सातत्याने उपक्रम राबवत असते . याप्रसंगी त्यांनी रोटरी क्लब राबवीत असलेल्या दीर्घकालीन सामाजिक उपक्रमांची माहिती दिली
रोटरी स्किन बँकचे डॉ राजेंद्र नेहते ह्यानी त्वचादनाबाबत मार्गदर्शन केले. डॉ सोनाली चिंधडे ह्यानी सूत्र संचलन केले
तर सचिव शिल्पा पारख ह्यानी आभार प्रदर्शन केले.

देशातील पहिले यकृत प्रत्यारोपण ज्यांच्यावर झालेले डॉ भाऊसाहेब मोरे ह्यानी आपले अनुभव कथन केले.रोटरी च्या सहा डिस्ट्रिक्ट चे पदाधिकारी सभासद नाशिक, पुणे, नागपूर येथून उपस्थित होते.
रोटरी चे पदाधिकारी सलीम बटाडा ,आशा वेणुगोपाल,दादा देशमुख ,मनीषा वीसपुते ,दिलीपसिंह बेनिवाल, विजय दिनानी,निलेश सोनजे,राज तलरेजा,सुचेता व रवी महादेवकर, भरत बिरारी उपस्थित होते. मविप्र वैद्यकीय महाविद्यालय रॉट्रॅक्ट क्लब चे विद्यार्थीनी आपला सहबाग नोंदवला.
महादान प्रबोधन विषयी प्रमुख वक्त्यांच्या मार्गदर्शनाचा सारांश
(नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान) मृत्युपंथाला लागलेल्या व्यक्तीचा जीव वाचवणे हे सगळ्यात मोठे पुण्य कर्म व नैतिक कृत्य आहे याबाबत जगामधील सर्व धर्म सर्व पंथ आणि सर्व जनसमुदाय यांचं एक मत आहे. तसेच अपंगांना सक्षम करणे हे सुद्धा पुण्य कर्मच आहे.
नेत्रदान, त्वचादान, अवयवदान आणि देहदान या सर्वदानांना श्रेष्ठदान किंवा महादान म्हणून संबोधलं जातं कारण मानवाचे कल्याण करणे हे या दानांमधून शक्य होते.
या महादानां बद्दल समाजामध्ये अत्यंत अल्प माहिती असून अनेक गैरसमज आहेत. पुरेशी व योग्य माहिती यांचा अभाव आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये दरवर्षी सुमारे पाच लाख व्यक्तींचे मृत्यू होत असतात. तसेच लाखो अंधांना दृष्टी पासून वंचित व्हावे लागते. अनेक आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या व्यक्तींना मृत्युपंथाची वाटचाल करावी लागते. म्हणूनच या श्रेष्ठदानां बाबत समाजाचे प्रबोधन करणे व समाजात जागृती निर्माण करणे यासाठी कार्य करणे ही सुद्धा अत्यावश्यक गोष्ट आहे.
नेत्रदान :-
अंध दोन प्रकारचे असतात. पैकी बहुसंख्य अंध व्यक्ती बुबुळामुळे आलेल्या अंधत्वाने ग्रस्त असतात. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान केल्यास, मृत्यू पावलेल्या माणसाची बुबुळे काढून अंध व्यक्तीला देता येतात. त्यामुळे त्या अंधाला दृष्टी मिळू शकते. तो अंध ही सृष्टी पाहू शकतो. असे हे नेत्रदान. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे चार अंधांना दृष्टी मिळू शकते. (वैद्यकीय संशोधनामुळे आता एका बुबुळाचे दोन भाग म्हणजे स्लाईस करून दोन अंधांना बसवता येतात.)
त्वचादान ;-
याबाबत कित्येक लोकांना किंबहुना काही डॉक्टरांना सुद्धा माहिती नाही. माणसाच्या मृत्यूनंतर सहा तासाच्या आत त्या व्यक्तीची त्वचा एका विशिष्ट मशीनने काढून घेऊन ती विशिष्ट पद्धतीने साठवली जाते. या साठवलेल्या त्वचेमधून 30 ते 40 टक्के पेक्षा जास्त भाजलेल्या रुग्णाचा जीव वाचवता येतो. त्या रुग्णाच्या शरीरावर त्वरित योग्य ते उपचार करता येतात. अशी ही जीवन संजीवनी त्वचा, मृत्यूनंतर दान करण्याचा संकल्प आपण सोडू शकतो.
देहदान :-
मृत्यूनंतर देह पुरून किंवा जाळून नष्ट करण्याऐवजी तो वैद्यकीय महाविद्यालयास दान करून वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा देहांचा उपयोग होतो. वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देहावर काम करण्याचे चांगले शिक्षण मिळाल्यास चांगले डॉक्टर्स चांगले सर्जन तयार होतात. आपल्या पुढील पिढ्यांना असे तज्ञ उपलब्ध होतात. यासाठी आपण आपला मृतदेह मृत्यूनंतर दान करण्याचा संकल्प करू शकतो.

अवयवदान :-
एखादी व्यक्ती हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये उपचार घेत असताना मेंदू मृत झाल्यास एका विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीच्या शरीरातील अनेक अवयव जसे की हृदय, यकृत, फुफ्फुसे, किडनी वगैरे अवयव त्याचप्रमाणे हाडे, कानाचे पडदे, गर्भाशय, हात असे अनेक अवयव कार्यरत असण्याच्या स्थितीत त्या मृतदेहातून काढून, अवयव खराब झाल्यामुळे मृत्युपंथाला लागलेल्या व्यक्तीच्या शरीरात खराब झालेल्या अवयवां ऐवजी बदलता येतात. त्या व्यक्तीला जीवनदान देता येते. अशा अवयवदानाचा संकल्प सोडून एखादी व्यक्ती जेंव्हा मेंदू मृत्यू झाली असेल तरच फक्त, त्या व्यक्तीच्या अवयवदाना मुळे अनेक व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. अशा अवयवदानाचा संकल्प आपण करू शकतो.
जिवंतपणी अवयवदान :-
तसेच जिवंत असताना सुद्धा आपल्या दोन किडन्यांपैकी एक किडनी, यकृताचा काही भाग आणि गर्भाशय हे अवयव, दान करू शकतो. जेणेकरून इतर रुग्णांच्या शरीरातील कमतरता भरून काढण्यास मदत होते. त्यांना मृत्यूपासून वाचवता येते.
अवयवदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून श्रेष्ठदानाचा संकल्प करूनअनेक मृत्युपंथाला लागलेल्या व्यक्तींचे प्राण वाचवून आपण सर्वश्रेष्ठ पुण्य मिळवू शकतो असा संकल्प उपस्थितानी केला.
याप्रसंगी रोटरी क्लब नाशिक मिडटाऊनतर्फे अवयव दाना संबंधित एक पथनाट्य सादर करण्यात आले