
वंचित कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करणार -नानासाहेब बेल्हेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम मजुरांना त्यांचे आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. नानासाहेब बेल्हेकर मित्र मंडळाच्या पाठपुराव्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, समता परिषदेचे नगर तालुकाध्यक्ष रामदास फुले व नानासाहेब बेल्हेकर यांच्या हस्ते मजुरांना साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच जालिंदर शिंदे, शिवाजी होळकर, महिंद्र चौगुले, प्रा. भाऊसाहेब पुंड, शाहूराज होले, प्रकाश कांडेकर, गणेश भोळकर, शिवाजी खामकर, संतोष बेल्हेकर, विनायक बेल्हेकर, तुषार फुले, सागर कदम, जिजाबापू होळकर, धोंडीभाऊ नरवडे, महेश फुले, शिवाजी शिंदे, शिवाजी गवारे, पितांबर जवणे, मारुती राऊत, बाळासाहेब कदम, जालिंदर होले, गोरख बेल्हेकर, नसीर सय्यद, गोरख भांबरे गावातील युवक, बांधकाम कामगार, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमारत बांधकाम कामगारांना प्रोटेक्टिव्ह शुज, सेफ्टी हेल्मेट, सोलर टॉर्च, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली जेवणाच्या डब्याची पिशवी, प्लास्टिक चटई, रिफ्लेक्टिव जॅकेट, पत्र्याची पेटी अशा विविध साहित्याचा समावेश असलेली किट देण्यात आली.
शहरालगत असलेल्या नेप्ती व पंचक्रोशीत मोठ्या संख्येने बांधकाम कामगार आहेत. या मजुरांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसून, पोटासाठी ते जीव धोक्यात घालून काम करत असतात. इमारतीचे बांधकाम करतांना अनेक मजुरांना दुखापत झाली आहे. या मजुरांना सरकारच्या विविध योजनांबाबत माहिती मिळावी यासाठी अनिता कोंडा व विद्या एक्कलदिवे यांनी मजुरांना मार्गदर्शन करुन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
नानासाहेब बेल्हेकर म्हणाले की, कामगार मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांचा फायदा या भागातील मजुरांना मिळण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे. असंघटित कामगारांना शासनाचे कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे अवघड बाब आहे. हा दुर्लक्षीत असलेला घटक प्रवाहात आनण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. अशा कामगारांची नोंदणी सुरु असून, त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
नानासाहेब बेल्हेकर मित्र मंडळाच्या वतीने गावात यापूर्वीही आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, रक्तदान व आदी सामाजिक उपक्रम राबविले असून, गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी देखील त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
