ग्रामीणदेशविदेश

वेश यांचा बावळा, अंगी मात्र नाना कळा!

या फोटोतल्या बाया तशा दिसायला साध्यासुध्या आहेत. मान्हेरे, आंबेवंगण, पिंपळदरावाडी, कोंभाळणे, एकदरे, खिरविरे या अकोल्याच्या अतिदुर्गम भागातल्या पाड्यांवर त्या वस्तीला असतात. त्यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्त्वामुळं त्या अलीकडे कुठेतरी उजेडात येताहेत. साध्यासुध्या सामान्यातल्या सामान्य दिसणाऱ्या या आयाबायांचं असामान्य कर्तृत्व कोणते? ते समजून घ्यायला हवे.

हिराबाई लहू गभाले या ‘ग्रामीण बँकर’ आहेत. मान्हेरे येथे त्या राहतात. बचत गटाची चळवळ त्यांनी नेटाने उभी केलीय. या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगारासाठी त्या भांडवल देत असून, त्यांना स्वतःच्या पायावर उभे केलेय. कितीतरी कुटुंबांचे स्थलांतर या महिलेने रोखले आहे.

ज्यांच्या सेंद्रीय शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांनी देशाच्या कृषी क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलंय, त्या देवगावच्या धान्यमाता ममताबाई देवराम भांगरे! देशाच्या शेती धोरणाच्या डॉक्यूमेंटमध्ये ममताबाई यांची विशेष केसस्टडी प्रसिद्ध झालीय. यावरुन त्यांच्या भात पिकातील संशोधनाचा अंदाज यावा. आयआयटी, आयआयएममधले प्रोफेसर, विद्यार्थी, अनेक धोरणकर्ते लोक इथे येऊन, ममताबाईंकडून व्यवस्थापन आणि संशोधन याचे धडे घेताय! त्यांचं महत्त्वपूर्ण काम समजून घेत अभ्यास करताय.

पिंपळदरावाडीच्या सोनाबाई विठ्ठल भांगरे हेही असंच मुलखावेगळं व्यक्तिमत्त्व! यांना जलतज्ज्ञ कोणी म्हणणार कारण त्यांचा रिसर्च पेपर एखाद्या इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश झालेला नाहीये ना म्हणून! मात्र त्यांचं काम थोर आहे. बाएफ या स्वयंसेवी संस्थेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेले बंधारे बघायला देशोदेशीचे लोक येतातय. नैसर्गिक झऱ्यांचा, प्रवाहांचा कोंडलेला, गुदमरलेला श्वास त्यांनी मोकळा केलाय. ते पाणी उताराच्या दिशेनं घरांत आणलंय. केवढं मोठं इनोवेशन आहे हे! कुठे पाणी आहे, हे त्या नेमकेपणाने सांगतात म्हणे. पिढीजात असावे हे सारे.

शांताबाई खंडू धांडे यांचा वेश अत्यंत बावळा, मात्र अंगी नाना कळा! काळ्या आईत कष्ट करताना त्या तिच्याशी एकरूप झालेल्या. रापलेली काळी पडलेली कातडी. यांचं वैशिष्ट्य हे की त्यांच्या आंबेवंगण येथील घराची कौलं दिसत नाहीत. विचारा का? तर त्यांच्या परसबागेतल्या वेलींनी छताचा, भिंतीचा संपूर्ण ताबा घेतलाय. वर्षभर घरावर, परसात त्या भाजीपाला घेतात, तो पण सेंद्रीय बरं का? रोज रोज ताजी ताजी भाजी! भारीय की नाही? यांची परसबाग आणि ‘वेलींचे घर’ बघायला तर जगभरातले अभ्यासक, जिज्ञासू इथं येतात! आता यांनाही कोणी परसबागतज्ज्ञ म्हणत नाही बरं का! नाही म्हणू देत त्याने काय फरक पडतो त्यांना. चिखलात, मातीत पाय रोवून उभी असलेली, वेलींशी घट्ट जैविक नातं असलेल्या शांताबाई भल्या आणि त्यांचं काम भलं, असा त्यांचा एकूण खाक्या असतोय!

हिराबाई हैबती भांगरे यांचेही असेच काहीतरी भन्नाट काम आकार घेतेय बरं. एकदरे येथील त्यांच्या वस्तीजवळ अत्यंत विशेष असे भात संशोधन केंद्र उभे राहतेय. कृषी विद्यापीठातल्या संशोधकाहून अधिक गोष्टी जाणतात हे नवरा-बायको! शेतातल्या पिकावर किती प्रेम करावं हे यांच्याकडून शिकावं!

ज्येष्ठ शास्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी ‘सीडमदर'(बीजमाता) म्हणून ज्यांचा गौरव केलेलाय त्या राही मावशींना तर आपल्यापैकी अनेकजण चांगले ओळखता! अलीकडे चार पाच वर्षांपासून त्या प्रकाशात आल्यात. बीबीसीने गौरवलेल्या जगभरातल्या १०० महिलांत मावशींचा समावेश आहे!त्यांची बियाणे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

या फोटोत बिताका या अत्यंत दुर्गम गावातली सीताबाई भांगरे नाहीयेत. ४० डांगी(देशी) गायी पाळणाऱ्या या आदिवासी महिलेनं गोऱ्हे विकून दूध, खवा विकून कुटुंबासाठी व्यवस्थित बेगमी चालवलेली आहे.

या सगळ्याजणी ग्रामीण, आदिवासी भागातल्या खऱ्याखुऱ्या आयडॉल आहेत! आपल्या कामातून ओळख निर्माण करत त्यांनी आपापली गावं, लहांनसे पाडे राज्याच्याच नाहीतर देशाच्या नकाशावर आणलेले आहेत. अन्नमाता, अन्नदात्या, बीजमाता ही विशेषणं इथं यांच्यापुढं थिटी पडली आहेत!

महाराष्ट्राच्या कोपऱ्यात, सह्यगिरीच्या गिरीकंदरातल्या पसरलेल्या अकोले तालुक्यातील या महिला कर्तृत्ववान, गुणवान असल्या तरीही उपेक्षेच्या धनी आहेत. वेगळी वाट निर्माण करणारं, त्यांचं काम दुर्लक्षितच राहिलं आहे, याची खंत आहे मनात. अर्थात आधी म्हटलं तसं त्यांना याचं काही पडलेलं नाहीये. त्या शिकलेल्या सवरलेल्या नाहीत. त्यांना विशेष अक्षरओळखदेखील नाहीये. कौलारू घरांत राहतात. भुई सारवतात. जमीन अंथरतात आणि आभाळ पांघरतात! यांच्या कामाकडं दुर्लक्ष होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं बाई असणं, हेही असू शकेल. त्यात त्या जन्मल्या, वाढल्या, खपल्या ते दूर दूर डोंगरदऱ्यांत. तिथं माध्यमांनाही टीआरपी मिळण्यासारखे विशेष काही नाही…

रोजच्या जीवन-मरणाच्या संघर्षात हातपाय हलवताना, अभावात जगताना इनोवेशन कसे जन्माला येते, हे राज्याच्या कारभारी मंडळीनी इथे येऊन, बांधावर शेतात बसून समजून घ्यायची गरज आहे. कृषी विद्यापीठातल्या संशोधकांचं संशोधन आम्ही अजिबात नाकारत नाहीत. मात्र केवळ विद्यापीठांत होते त्यालाच संशोधन मानायला आम्ही तयार नाही आहोत. कारण ग्रामीण शहाणपणातून आलेल्या शाश्वत विकासाच्या संकल्पना आणि पारंपरिक ज्ञानपरंपरा याला नाकारणारे संशोधन हेच मुळात ज्ञानाचे राजकारण असून, आदिवासी लोकांकडे असलेली अनुभवांची शिदोरी नाकारणारे आहे. ज्यांच्या जीन्समध्ये, डीएनएमध्ये पिढीजात ज्ञान आहे, ज्यांनी काहीतरी क्रिएटिव ‘करुन दाखवलं’ आहे. अशा कामाकडे धोरणकर्त्यांनी, प्रसारमाध्यमांनी, धुरीणांनी दुर्लक्ष करणे म्हणजे मोठी आत्मवंचना ठरेल.

हातानं काम करणं हलकं आणि लँबमध्ये विद्यापीठातले ‘शैक्षणिक संशोधनं’ भारी हा सरसकट गैरसमज दूर केला पाहिजे. ही अपसमज ज्ञानाच्या राजकारणमूलक अभिजनवादी समजेतून येते. ती बाजूला सारुन, निकोप दृष्टीनं, डोळे उघडे ठेवून ग्रामीण भागातील संशोधन, इनोवेशन समजून घेऊन त्यानुसार धोरणांनाही दिशा द्यायची गरज आहे. या कामात कृषिविषयक धोरणांच्या संकल्पनाही दडलेल्या आहेत. फक्त डोळे उघडे ठेवून त्याकडे बघायला हवे. अन्यथा मातीतल्या माणसांच्या अनुभवांना नाकारुन आखल्या जाणाऱ्या शेतीविषयक धोरणांना मातीचा वास कधीही येणार नाही. त्यातून शेती आणि शेतकऱ्यांचं भलं होण्याची शक्यता धुसर वाटते.

बाएफ संस्था, या स्वयंसेवी संस्थेतले सर्व जाणते कार्यकर्ते अधिकारी, विशेषत: जितीन साठे यांनी विशेषकरुन यांचं या महिलांच्या कामाला साथ, सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलंय, त्यांच्याविषयी मनातून कृतज्ञ भाव आहेत!

काल यां सगळ्या जणीना भेटलो, जरासे बोललो. डोंगराएवढया मोठ्या उंचीचे काम करूनही सगळ्यांचे पाय मातीत घट्ट रोवलेले आहेत. एरवी प्रश्नावल्या भरुन घेणारे थोर थोर संशोधक सुटाबूटात टाय लावून येत नॅशनल, इंटरनॅशनल कॉन्फ्रेंससमधून इंग्रजी येते म्हणून आपले संशोधनजन्य ज्ञान वगैरे पाजळत असतात.(अर्थात यालाही सन्माननीय अपवाद नक्की आहेत.)

आमचा मुद्दा इतकाच आहे, की शाश्वत विकासासाठीच्या कृषी धोरणांच्या संकल्पना जमिनीवरच्या कामात धोरणकर्त्यांनी शोधल्या पाहिजेत. या कामाला कमअस्सल लेखू नये.

——–

भाऊसाहेब चासकर

अकोले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button