क्षेत्र कोणतेही असो प्रयत्न गरजेचे — अभिनेत्री सुरेखा कुडची

अकोले प्रतिनिधी
— जीवनात जर आपले ध्येय निश्चित असेल तर समोर कोणतीही संकटे , अडथळे निर्माण झाली तरी विचलीत न होता त्या ध्येयासाठी क्षेत्र कोणतेही असो प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी केले.
श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या तर संस्थेच्या अध्यक्षा शैलजा पोखरकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , सतीश नाईकवाडी हे उपस्थित होते. सुरेखा कुडची यांनी आपल्या फिल्म इंडस्ट्रीचा प्रवास सांगत कुटुंबातील सर्व आर्मीमध्ये असतांना वेगळे क्षेत्र निवडत त्यात प्रचंड मेहनत , संयम व आत्मविश्वास या बळावर स्वतःची प्रतिमा निर्माण करता आल्याची भावना व्यक्त केली.ध्येय समोर ठेवा व त्यासाठी कष्ट घ्या , यश मिळतेच असा मौलिक संदेश देत दिलेला शब्द पाळायचा , मग कितीही प्रसंग खडतर असो ,कारण पैसा , प्रतिष्ठा , यश यामागे धावू नका तर आपण कसे आहोत, कसे राहतो, वागतो , काम करतो यावर खूप करियर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन हार न मानता प्रत्येक वेळी संधीचे सोने करा असा कानमंत्र दिला.एखाद्या 22 ते 24 मिनिटांचा एपिसोड तयार करण्यासाठी 15 तास मेहनत घ्यावी लागते व म्हणून तुमच्या समोर अनेक करियर्स आहेत , त्यातील आपले आवडते , ज्यात आपल्याला आनंद मिळेल, करायची तयारी आहे तेच करा.
विद्यार्थ्यांच्या अनेक उत्स्फूर्त प्रश्नांना त्यांनी समर्पक व दिलखुलासपणे उत्तरे दिली. सोडा, सोडा राया हा नाद खुळा या गाजलेल्या गाण्यावर दिलखेचक ठेका धरत कमालीचे नृत्य सादर केले व तर शालेय विद्यार्थ्यांने स्वतः सुरेखा कुडची यांचे स्केच बनवून त्यांना भेट म्हणून दिले तेव्हा त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करत त्याचा सत्कार केला.
यावेळी विविध स्पर्धेतील परितोषिकांचे पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात शैलजा पोखरकर यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत उपक्रमांचे कौतुक केले.यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रकाश आरोटे यांनी, सूत्र संचालन संजय पवार यांनी केले तर पर्यवेक्षक संजय शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले .यावेळी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी धुमाळ, उपप्राचार्य सुजल गात , पर्यवेक्षक मंगेश खांबेकर , शिक्षक पालक संघाचे पदाधिकारी , संस्थेच्या विविध विद्यालयातील आजी माजी मुख्याध्यापक , शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.