
संचालक प्रशांत गायकवाड यांची यशस्वी मध्यस्थी!
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
यावर्षी खरीप हंगामासाठी खडकवाडी शाखा अंतर्गत पळशी खडकवाडी व पोखरी या तिन्ही सोसायट्यांच्या खरीप हंगामातील पिकांसाठी बँकेच्या खडकवाडी शाखेतून शेतकरी सभासदांच्या नावे कर्ज घेण्यात आले. यासाठी एचडीएफसी या विमा कंपनीशी बँकेने करार केलेला आहे, खडकवाडी पोखरी पळशी हद्दीतील सर्व १९१४ सभासद शेतकऱ्यांचा पिक विमा हप्ता रक्कम ११ लाख १४ हजार रुपये एचडीएफसी ऍग्रो इन्शुरन्स कंपनीकडे ऑनलाइन पद्धतीने भरणा करण्याचे ठरले होते. यासंदर्भात विमा हप्ता भरला गेल्याचा मेसेज सर्व सभासदांना दिनांक २१ जुलै २०२२ रोजी प्राप्त झालेला आहे. त्यानुसार बँकेने सदर हप्ता १६ ऑगस्ट पूर्वी भरणे अपेक्षित होते त्या संदर्भात एचडीएफसी चे व एडीसीसी बँकेचे पत्र शाखाधिकार्यांना प्राप्त झालेले होते. परंतु बँकेच्या व सोसायटीच्या हलगर्जीपणामुळे सदर हप्ता संबंधित विमा कंपनीला वेळेत प्राप्त झाला नाही, ही बाब अतिशय संशयास्पद आहे. सभासद, शेतकरी प्रथम सभापती काशिनाथ दाते यांचेकडे आले व हा सर्व प्रकार त्यांना सांगितले नंतर त्यांनी तातडीने बँकेच्या वरिष्ठांना झालेली चुक निदर्शनास आणून पाठपुरावा केला. यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त पाऊस पळशी मंडळ विभागात पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून त्यांनी विमा कंपनीशी संपर्क साधला असता विमा कंपनीने तुमचा विमा उतरवला गेलेला नसल्याचे कारण सांगितले.
यासंदर्भात सभासदांनी तालुका विकास अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता ही बाब लक्षात आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बँकेचे संचालक प्रशांत दादा गायकवाड यांनी विमा कंपनीशी यशस्वी मध्यस्थी करून मुदतीनंतर देखील शेतकऱ्यांचा विमा, विमा कंपनीने स्वीकारलेला आहे, या गैरप्रकाराबद्दल संबंधित शाखाधिकार्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल याचे आश्वासन संचालक गायकवाड यांनी दिले. याबाबत शेतकरी सभासदांनी प्रशांत गायकवाड यांचे आभार मानले. यापूर्वी देखील विमा संदर्भात सावळा गोंधळ झाला असल्याचा संशय सभासद वर्गाकडून उपस्थित झाला.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांनी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री वरपे तसेच बँकेचे संचालक प्रशांत दादा गायकवाड यांच्याशी या गैरप्रकाराबद्दल संपर्क साधला. बँकेच्या व्यवस्थापक मंडळाने या तक्रारीकडे गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी विमा कंपनी सोबत यशस्वी मध्ये केली याबाबत सभापती काशिनाथ दाते सर यांनी बँकेचे आभार मानले.
यासंदर्भात विकासराव रोकडे, सखाराम नवले, एडवोकेट अजित रोकडे, अमोल रोकडे, अरुण गागरे, संतोष शिंदे, भाऊसाहेब नवले, प्रवीण शेठ भन्साळी, प्रताप रोकडे, धनंजय ढोकळे, गणेश चौधरी, काशिनाथ हुळावले, बाबासाहेब हुलावळे, देविदास साळुंखे, बि.डी ढोकळे, संजय कर्नावट, भाऊसाहेब गागरे यांनी सदर घटना सर्वप्रथम बँकेचे अधिकारी इंद्रभान शेळके यांच्या निदर्शनास आणून दिली.