जांभळेगावचे आधारस्तंभ स्व.तबाजीदादा गवांदे

१९८० ते १९९० अशी १०वर्षे जांभळे गावचे सरपंच व जांभळे विविध कार्य सोसायटीचे चेअरमन अशा पदांवर राहून जांभळे गावची सेवा केलेले तबाजीदादा गवांदे यांचे दुःखद निधन झाले.
कुटूंबात थोरले म्हणून गवांदे परिवारासह ग्रामस्थांमध्ये त्यांचा कारभारी म्हणून लौकीक होता. खंडी दोन खंडी गाई,म्हशीं आणि सहा-आठ बैलांची दावण घरी असायची. खिलारी बैल आणि बैलगाडा हा नाद दादांनी जोपासला होता. त्यामुळे प्रसिद्ध गाडा मालक म्हणून पुणे-अहमदनगर जिल्हयांत तबाजी दादांचा लौकिक होता. सख्खे,चुलत सात भाऊ व सात बहिनी असा दादांचा मोठा परिवार होता.एकत्रित कुटूंब पध्दतीचे मोठे कुटूंब तबाजी दादांनी सन१९९४ पर्यंत एकत्र ठेवले. त्यामुळे गवांदे परिवार आणि दादांचा जांभळेगावासह पंचक्रोशीत मोठा लौकीक होता. शांत,संयमी स्वभावाने सर्वांची मने सांभाळून तबाजी दादांनी गावचे व घराचे कर्तेपण निभावले.
आपले दोन चुलते वारल्यानंतर १९६०-७०च्या दशकांत वडिल स्व.सबाजी लक्षमण गवांदे यांच्या बरोबरीने तबाजीदादांनी कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांचे सख्खे-चूलत बंधू कमळू व गबाजी यांच्या बरोबरीने कळमजाई या शेतात नांगरणी करून केण्या लावून आपल्या शेतीचा विकास घडवून आणला. बंधू विठल याना मुंबईला पाठवून दिले त्यांनी ही मुंबईला डबेवाल्याचा व्यावसाय करून आपल्या भावांना साथ दिली. कुटुंबास आर्थिक स्रोत दिला. त्यांचे चवथे भाऊ कमळू यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय सांभाळला.गाई म्हशी पाळणे हा त्या काळी मोठा व्यवसाय होता ते काम स्व.कमळू यांनी केले. त्यांचे पाचवे भाऊ महादेव मारुती हे ओतूर ला आत्या कडे राहून शिक्षण घेत होते. पदवी अभ्यासासाठी त्यांना नगर ला पाठवले पदवीनंतर ते ओतुरलाच संत गाडगे बाबा हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी पत्करली. नंतरच्या काळात बंधू विठलराव १९६९ मध्ये गावाला आल्यावर कमळूला मुंबईला पाठवले त्याने काही दिवस ट्रकवर क्लिनर म्हणून काम केले. नंतर बेस्टमध्ये ड्रायवर म्हणून नोकरीला लागले.बेस्ट मध्ये असताना रात्री ते रिक्षा देखिल चालवत. त्यांनी कुटूंबाला मोठा आर्थिक आधार दिला. शंकरराव आणि भिमाजी(ठकसेन) यांचे देखिल शिक्षण ओतूरला झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पूण्याला गेले. शंकरराव कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षक झाले तर ठकसेन बेस्टमध्ये कंडक्टर झाले.त्यांनी घाटकोपर येथे हॉटेल व्यवसाय देखिल केला. या साऱ्यांच्या पाठिशी तबाजी दादांची साथ होती. सर्व भावांची कौटुंबिक घडी बसवण्यात दादांचा वाटा मोठा आहे.
- दशक्रिया –
- रविवार दिनांक ४ सप्टेंबर२०२२,ठिकाण-जांभळे,
- ता.अकोले जिल्हा अहमदनगर
- वेळ सकाळी ७.३० वाजता
- प्रवचन सेवा-ह.भ.प.अश्विनीताई म्हात्रे डोंबिवली
तबाजीदादांना दोन मुले व दोन कन्या.धाकटा मुलगा यशोमंदिर सहकारी पतपेढीच्या माध्यमातून जनसेवेचे काम करीत असून थोरला मुलगा राज गवांदे सर हे सध्या अकोले तालुक्याचे सुपूत्र महाराष्ट्राचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असून अहमदनगर जिल्हा मराठा महासंघाचा जिल्हाअध्यक्ष म्हणून काम पहात आहे. तसेच अकोले बाजार समितीचे संचालक असताना अडचणीत असलेली बाजार समिती उर्जित अवस्थेत आणण्याचे काम राज गवांदे सरांनी केले. तसेच कानिफनाथ माध्यमिक विद्यालय बदगी ता.अकोले येथे शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. अनेक संस्थांवर मा आमदार वैभवराव पिचड यांच्या बरोबरीने काम करीत असून वडिलांचा सामाजिक कामाचा वारसा राज गवांदे सरांनी कामातून जपला आहे.
गेली २० वर्षे गावची ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सोसायटीचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे जांभळे गावचे नेतृत्व करतानाच जिल्हा पातळीवर आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे.दादाच्या कुटुंबातील दादांचा पुतण्या इनकम टॅक्स ऑफिसर सुभाष गवांदे यांच्या माध्यमातून जांभळे जिल्हा परिषद शाळा दत्तक घेउन त्या शाळेसाठी चार-पाच लाख भरीव मदत करून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली आय एस ओ शाळा बनण्याचा मान जांभळे गावाला मिळाला. जांभळे गावातील रस्त्यांना दुतर्फा वृक्षारोपण करण्यासाठी सुभाष गवांदे यांनी मोठी मदत केली.गावातील पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन सुभाष गवांदे आणि सहकाऱ्यानी दोन लाख रु किमतीची पिण्याच्या पाण्याची टाकी बसवली. दादांच्या परिवारातील स्वर्गीय गबाजी दादा,स्वर्गीय कमळू,विठ्ठल,शंकरराव,भिमाजी , या परिवाराने जांभळे गावात महादेव मंदिर,कळंबजाई मंदिर ही दोन मंदिरे बांधली असून अडल्यानडल्यांना कोणताही भेद न करता मदत करण्याचा दादांचा वारसा या परिवारातील अनिल,दत्ता,तुषार,सागर,अतुल,डॉ सुशांत,देवानंद,रमाकांत ,स्वराज,चंद्रकांत हुलवळे,अनिल फापाळे या सर्वांनी कामातून जपला आहे.
सामाजिक एकोपा व गावचा विकास व्हावा यासाठी दादांसोबत माजी सरपंच स्वर्गीय बबनराव हुलावळे, स्वर्गीय फक्कड शेठ गवांदे,स्वर्गीय विश्वनाथ खरात,माजी सरपंच विठ्ठल खरात,माजी सरपंच बाबुराव काळे ,माजी सभापती बबनराव गवांदे,प्रभू हुलावळे यांचे योगदान लक्षणीय आहे.नवीन पिढीला प्रेरणादायी अशा प्रकारचे काम दादांनी उभं केलं असून आमच्या पिढीतील सगाजी हुलावळे,ए व्ही हुलावळे सर,एम एम गवांदे सर ही त्या काळातील पिढी उभं करण्यासाठी दादांचं मोठं योगदान आहे गावातील,कुटुंबातील सर्वांनी शिकले पाहिजे प्रगती केली पाहिजे यासाठी स्वतःच्या कुटुंबात ७ शिक्षक दादांनी बनवून परिसरात एक आदर्श निर्माण केला.अत्यंत मितभाषी,प्रसिद्धी पासून दूर,मात्र संपूर्ण नातेवाईकांमध्ये,परिसरामध्ये आदरयुक्त दरारा असलेल्या
स्व.तबाजीदादा संस्कारांच्या रूपाने कायम आपल्यात आहेत. दादांना भावपुर्ण श्रध्दांजली!
नामदेव भाऊराव हुलवळे