पारनेर महाविद्यालयात लेखन वाचन कार्यशाळा संपन्न

वाचन लेखन माणसाला समृद्ध बनविते. — महावीर जोंधळे
पारनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, न्यू आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, पारनेर महाविद्यालयात मराठी विभागांतर्गत लेखन वाचन कार्यशाळा संपन्न झाली. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे आणि प्रसिद्ध गझलकार संजय पठाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांमध्ये वाचण्याची मानसिकता कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो बौद्धिक विकास होणे अपेक्षित आहे. तो होत नाही. आजच्या कालखंडात अशा कार्यशाळा आयोजित होणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या कार्यशाळेत सहभागी होणारे विद्यार्थी निश्चितपणे वाचनाचे महत्व जाणणारे आहे ते पुढील काळात निश्चितपणे चांगले वाचन आणि गुणवत्तापूर्ण लेखन करतील याचा विश्वास वाटतो.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केलेले ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे मार्गदर्शन करताना म्हणाले की, हा युवक वर्ग उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे, इतिहासाकडे तुम्ही डोळसपणे पाहिले पाहिजे. हा इतिहास आपले सांस्कृतिक संचित आहे. जोवर आपली संस्कृती व इतिहास आपण जाणून घेणार नाहीत तोवर आपली विचारदृष्टी तयार होणार नाही . अलीकडे समाजमाध्यमांमुळे अत्यंत जलद गतीने कोणताही संदेश असो वा एखादी घटना असो ती सर्वदूर प्रसारित होते. या संदेशांमागील सत्यता व वास्तविकता जाणून न घेता आपण ते पुढे सरकवत जातो. त्यामुळे अनेकदा चुकीच्या गोष्टी प्रसारित होतात. त्याचे दूरगामी परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. त्यामुळे, कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट आपल्या सद्सद्विवेक बुध्दीच्या पातळीवर आजमावून घेणे आवश्यक असते. आजच्या तरुण पिढीने साहित्य, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांचा सखोल व बारकाईने अभ्यास केला पाहिजे.आपल्याला आलेले अनुभव शब्दबध्द करायला शिकले पाहिजे. त्यासाठी आधी वाचन करायला हवे. वाचन माणसाला समृद्ध बनविते. वाचनाने आपल्याला सधक बाधक विचार करण्याची सवय लागते. आपल्याला एक विचार दृष्टी वाचनाने प्राप्त होते. असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यशाळेतील दुसरे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रसिद्ध गझलकार संजय पठाडे यांनी विद्यार्थ्यांना गझल या रचना प्रकाराबद्दल सांगून अतिशय मार्मिक विचार मांडणाऱ्या स्वरचित गझल सादर केल्या. तत्पूर्वी पारनेर तालुक्याचा इतिहास व इतिहासाने नोंद घेतलेल्या पारनेर भूमिपुत्रांची माहिती त्यांनी सांगितली. त्याचबरोबर वाचनामुळे ही व्यक्तिमत्त्व घडली, असे सांगत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. उत्कृष्ट लेखन वाचनाशिवय शक्य नाही. लेखन म्हणजे व्यक्त होणे. लेखन म्हणजे आपले जगणे शब्दबध्द करणे आहे. त्यामुळे लिहिते होणे आवश्यक आहे. कविता कशी लिहावी? या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी कवितेतून दिले. शेवटी सामाजिक जाणीव व्यक्त करणारी गझल सादर करून व्याख्यानाचा समारोप झाला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, कला शाखाप्रमुख डॉ. दीपक सोनटक्के, डॉ. विजयकुमार राऊत, प्रा. हनुमंत गायकवाड, प्रा. अशोक मोरे, प्रा. वीरेंद्र धनशेट्टी, प्रा. संदीप ठोंबरे, प्रा. ज्योत्स्ना म्हस्के, प्रा. प्रतीक्षा तनपुरे, प्रा. शुभदा आरडे आदी प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या समन्वयक म्हणून डॉ. माया लहारे यांनी काम पाहिले तर, आभार मराठी विभागप्रमुख डॉ. हरेश शेळके यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नंदकुमार उदार यांनी केले.