मंत्री छगन भुजबळ यांनी केले सत्यशोधक चित्रपटाच्या पोस्टरचे उद्घाटन!

नाशिक,दि.३ :- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित समता फिल्मस् च्या वतीने निर्मिती करण्यात आलेल्या सत्यशोधक चित्रपटाच्या पोस्टरचे राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथील कार्यालयात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, दिलिप खैरे,समता फिल्मस् चे आप्पा बोराटे,प्रवीण तायडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी,सुनील पैठणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी निर्मात्याकडून मंत्री छगन भुजबळ यांना प्रारूप ट्रेलर दाखविण्यात आले. लवकरच हे ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सर्व टीमला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
समता फिल्मस् च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले’ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा मराठी चित्रपट बनविण्यात आला आहे. हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, उच्च दर्जाचे उपकरणे आणि व्हीएफएक्सचा वापर करण्यात आलेले आहे. या चित्रपटात महात्मा जोतीराव फुलेंचा समाज परिवर्तनासाठी केलेला संघर्ष, आधुनिक महाराष्ट्राच्या विकासात, कामगार चळवळीत महिलांचा शैक्षणिक विकासात, आधुनिक इमारतींची बांधणीत, कशी भरीव कामगिरी केली आणि त्या संघर्षात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी त्यांना कशी साथ दिली आणि त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजप्रबोधन कसे केले, हे सर्व पैलू चित्रपटात खूप सुंदरतेने दाखविले आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राज्य पुरस्कार विजेते दिग्दर्शक श्री. नीलेश जळमकर यांनी केले आहे. या चित्रपटात महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी यांनी खूप सुंदर साकारली आहे आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत, तसेच रवींद्र मंकणी, रवी पटवर्धन, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा यांनी सुद्धा कलाकार म्हणून काम केले आहे.

या चित्रपटाची पटकथा तयार करण्यासाठी राज्य शासनाचे प्रकाशित पुस्तकांचा संदर्भ देण्यात आला आहे आणि महात्मा जोतीराव फुलेंचे गाढे अभ्यासक माननीय साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट पूर्ण केला आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अमित राज आहेत, त्यांनी उत्कृष्ट संगीत दिले आहे. तर पार्श्वसंगीत राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीर फातर्फेकर यांनी दिले आहे.
हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर प्रदर्शित करण्यात येणार आहे.