मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पूजा करण्याचा अधिकार नाही !
आमदार निलेश लंके

.
मारहाण झालेल्या भागा महाराज यांना महापुजेचा मान मिळावा !
आ. लंके
दत्ता ठुबे
पारनेर : प्रतिनिधी
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळयादरम्यान आळंदी येथे मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये पारनेर तालुक्यातील नांदूरपठार येथील भागा महाराज घोलप हे गंभीर जखमी झाले आहे. डोक्यास मार लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असून नगर येथील शासकिय रूग्णालयात त्यांच्या डोक्याचे बुधवारी स्कॅन करण्यात आले. दरम्यान, मारहाण झालेल्या भागा महाराज यांना महापुजेचा मान मिळावा अशी मागणी आ. नीलेश लंके यांनी केली आहे.
आळंदी ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळयासाठी नांदूरपठार येथील विणेकरी भागा महाराज घोलप हे नित्यनियमाप्रमाणे यंदाही आळंदी येथे गेले होते. रविवारी माउलींच्या पालखी प्रदशिणादरम्यान नित्यसेवक म्हणून सेवा देणारे विद्यार्थी निघाले असता पोलीसांनी त्यांना आडविले. त्यानंतर पोलीस व वारक-यांमध्ये धुमश्चक्री उडाली. या सर्वांकडे पास आणि दिंडी या दोन गोष्टी नसल्याने त्यांना प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. दरवर्षी प्रवेश देण्यात येतो, यंदा नकार का असे म्हणत वारकरी विद्यार्थी आक्रमक झाले. आणि ढकलाढकली सुरू झाली. पोलीसांना दुर सारून वारकरी विद्यार्थी महाद्वाराकडे जाण्यासाठी धावू लागले. पोलीसांना त्यांना रोखणे अशक्य झाल्याने लाठीचार्ज सुरू झाला त्यातच हभप भागा महाराज घोलप हे सापडले.

आ. लंके यांच्याकडून विचारपूस
भागा महाराज घोलप हे गंभीर जखमी अवस्थेत असताना त्यांना नांदूरपठार येथे आणण्यात आले. टाकळीढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने बुधवारी त्यांना नगरच्या शासकिय रूग्णालयात हालविण्यात आले. तेथे त्यांच्या डोक्याचे स्कॅन करण्यात आले. आ. नीलेश लंके यांनी शासकिय रूग्णालयात जाऊन घोलप महाराजांची विचापूस केली. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात सुचना दिल्या.
मला मारू नका, मला मारू नका !
बेदम मारहाण झाल्यामुळे घोलप महाराज यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आहेत. मला मारू नका, मला मारू नका असे वारंवार म्हणत आहेत.
वारकरी सांप्रदायाकडून निषेध
वारकरी सांप्रदाय व नांदूरपठार ग्रामस्थांनी घोलप महाराज यांना पोलीसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीचा तिव्र शब्दात निषेध केला आहे. प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे लाठी चार्ज झाल्याचा आरोप नांदूरपठार ग्रामस्थांनी केला आहे.
५४ वर्षांची परंपरा
गेल्या 54 वर्षांपासून विणेकरी असलेले घोलप महाराज हे नियमितपणे माऊलींच्या पालखीसोबत आळंदी ते पंढरपूर या पायी वारीसाठी जातात. यंदा त्यांना लाठीचार्जमध्ये अमानुष मारहाण झाल्याने कोरोना काळाचा अपवाद वगळता त्यांची 54 वर्षांपासूनची परंपरा खंडीत झाली आहे.
पाठीवर लाठयांचे व्रण
पोलीसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये भागा महाराज यांच्या पाठीवर, हातावर लाठयांचे व्रण उमटले आहेत. आजही ते तसेच आहेत. डोक्यास मार लागल्याने त्यांची मानसिक स्थितीही बिघडली आहे.
वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सर्वांना परिचित असणारे माझ्या मतदार संघातील नांदूर पठार येथील वारकरी ह.भ.प भागा महाराज घोलप (विणेकरी) हे गेल्या ५४ वर्षा पासून अखंड पणे आळंदी ते पंढरपूर अशी माऊलीच्या पालखी सोहळ्या बरोबर पायी वारी करत आहेत.रविवारी आळंदी या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्या करीता ह.भ.प भागा महाराज घोलप गेले होते. त्या ठिकाणी उडालेल्या गोंधळात त्यांना पोलिसांकडून प्रचंड मारहाण झाली. त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे आज ही ते चांगल्या मनःस्थितीत नसून फक्त मला मारू नका ,मला मारू नका अशा घाबरलेल्या अवस्थेत आहेत.सध्या ते सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी असून त्याना अमानुष मारहाण झाल्याने ते घाबरलेल्या मनस्थितीत आहेत.
आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला ही घटना ऐकण्यासाठी सुद्धा अत्यंत क्लेशदायक वाटते. लाठी चार्ज करायला समोर कोणी चोर,दरोडेखोर अतिरेकी होते का ? कोणी शातीर गुंड होते, ज्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लगबगीने लाठी चार्ज करावा लागला.याच्यामध्ये मंदिर प्रशासन समितीचा तेवढाच मोठा हातभार आहे. वारकरी त्याच्या घरून आळंदीला ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता चालत येतो कारण त्याला माऊलीच्या समाधीचे दर्शन हवे असते.
पंढरपुरात दरवर्षी वारीच्या निमित्ताने वीस ते पंचवीस लाख लोक एकत्र जमलेले असतात. परंतु तिथे अशी कुठली घटना घडल्याचे ऐकिवात नाही. पुणे पोलीस प्रशासनाने त्यांना हे कृत्य का करावे लागले याचे किमान महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टीकरण द्यावे.
वारी चालते ती वारकऱ्यांच्या निष्ठेने भक्तीने आणि प्रेमाने. प्रशासनाने वारीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची भूमिका बजावताना त्यांच्याकडून वारकऱ्यांवरच वार होऊ नयेत.
या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.आमदार नीलेश लंके