वीज कंत्राटी कामगारांचे आंदोलन 31 मे 2025 पर्यंत तात्पुरते स्थगित!

पुणे- दि.6 मार्च 2025 रोजी महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक मानव संसाधन माननीय परेश भागवत तसेच मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.संजय ढोके व संघटना पदाधिकाऱी सचिन मेंगाळे, राहुल बोडके, उमेश आणेराव, सागर पवार सहभागी होते आणि दि.13 मार्च 25 रोजी अपर प्रधान सचिव ऊर्जा मा.आभा शुक्ला यांच्या उपस्थितीमध्ये संघटना प्रतिनिधी यांची एक मीटिंग मंत्रालयात झाली, या बैठकीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात, सागर पवार उपस्थित होते.
या मीटिंग मध्ये संघटनेने दिलेल्या पत्रातील समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महावितरण प्रशासन कशी सकारात्मक पावले उचलली आहेत हे समजले.

संघटनेने पत्राद्वारे मांडलेल्या वीज कंत्राटी कामगारांच्या सर्व प्रलंबित समस्या शासन व वीज कंपनी प्रशासनाच्या वतीने लवकरच येत्या काळात पूर्ण करण्यात येतील. दोषी कंत्राटदारांवर योग्य व कठोर कारवाई केली जाईल. कंत्राटदार विरहित कंत्राटी कामगार पद्धती साठीचा हरियाणा पॅटर्न तसेच राज्यातील कंत्राटी कांमगारांच्या किमान वेतन विषयी प्रलंबित असलेली वेतन वाढ हा विषय तसेच वीज उद्योगासाठी किमान वेतनाची स्वतंत्र श्रेणी निर्माण करणे इत्यादी धोरणात्मक विषयासाठी शासनाच्या विविध अंगाशी संघटना व आपण एकत्रित संवाद साधून आगामी काळात या समस्या नक्कीच सोडवू असे आश्वासित केले.
त्यामुळे संघटनेच्या सर्व केंद्रीय प्रमुख पदाधिकारी तसेच 36 जिल्ह्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व सचिव यांच्याबरोबर ऑनलाईन बैठकीत विधानसभेवरील भव्य मोर्चा तात्पुरता स्थगित करून शासन व प्रशासनाकडून प्रलंबित समस्यां लवकरात लवकर सोडवून घेण्यासाठी होकार दर्शवला व सध्या तात्पुरते हे आंदोलन 31 मे 2025 पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहीती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.