इतर

शिर्डीत १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास सुरवात

समाज एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संत विचारांमध्ये – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

संत, वारकऱ्यांकडून संस्कृती संवर्धनाचे कार्य – मंत्री संजय शिरसाठ

शिर्डी, दि.२२ – संत साहित्य, विचारातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून संताची भूमिका लोककल्याणाची होती. संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित होते. समाज एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास शिर्डी येथे सुरुवात झाली. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प.माधवमहाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प चकोर महाराज बावीस्कर आदी उपस्थित होते.

श्री साईबाबांच्या शिर्डीनगरीत संत साहित्य संमेलनाचे आयोजन ही जिल्हावासियांसाठी भाग्याची गोष्ट असल्याचे नमूद करत पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, संत साहित्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला आहे. संताची भूमिका लोककल्याणाची होती. मराठी भाषा व तिच्या बोली भाषांमध्येही संत साहित्याचे प्रतिबंब दिसून येते. संत साहित्य समाजाच्या उद्धारासाठी आहे.

संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित होते. समाजाचे ऐक्य टिकविण्याची ताकद संत साहित्यात असल्याने प्रत्येकाने संत साहित्य वाचले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया मजबूत करण्याचे काम या साहित्यातून झाले आहे. संतानी समाज सुधारणेचा मंत्र आपल्याला दिला. संत साहित्याच्या माध्यमातून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम झाले. ही परंपरा पुढे नेतांना लोकशिक्षण व लोकजागृतीचे काम अविरतपणे सुरू ठेवण्याचे काम संत आणि वारकरी निश्चित करतील,अशी अपेक्षाही श्री.विखे पाटील यांनी व्यक्त केली.

वारकऱ्यांकडून समाज एकसंघ ठेवण्याचे काम – रामदास आठवले

महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या विचारांचा वारसा घेऊन वारकरी काम करतात. माणसाचे कल्याण साधण्याचे आणि सुखदुःखासाठी जगण्याचा मंत्र देण्याचे काम वारकरी करतात. संत, वारकरी नसते तर समाज व्यवस्था टिकली नसती. माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे व समाज एकसंघ ठेवण्याचे काम संत, वारकऱ्यांनी केले. वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. समाजातील कुप्रवृत्ती बाजूला नष्ट करण्यासाठी संत, वारकऱ्यांनी समाजप्रबोधन व संस्काराचे काम प्रभावीपणे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संत आणि वारकरी हे संस्कृती टिकवण्याचे काम करतात. वारकऱ्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा सामान्य जनांपर्यंत पोहोचतो, समाजातील सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होते. राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या समन्वयाने समाजात अनुकूल बदल घडवून आणण्याचे काम व्हायला हवे.

वारकरी साहित्य संमेलनास सामाजिक न्याय विभागाने २५ लाख रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. सर्व वारकरी दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांची शासनाकडून मदत दिली जाईल. संत साहित्य व वारकऱ्यांना आवश्यक सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

संमेलनाध्यक्ष श्री.देहूकर म्हणाले, संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय हे मराठी संस्कृती आणि भक्ती परंपरेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. वारकरी संप्रदाय हा भगवान विट्ठलाच्या भक्तीवर आधारित असून, त्यात संतांनी रचलेले साहित्य हे भक्ती, ज्ञान व समाज प्रबोधनाचे माध्यम बनले आहे.

यावेळी ह.भ.प माधव महाराज शिवणीकर व सदानंद मोरे यांची भाषणे झाली.

प्रास्ताविकात विठ्ठल पाटील यांनी वारकरी संत साहित्य संमेलन आयोजनामागील भूमिका विशद केली.

संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी, श्री.साईबाबा समाधी मंदीर ते संमेलनस्थळ शेती महामंडळ मैदानापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सांगता अश्व रिंगणाने करण्यात आली.

दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचा समारोप २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनास राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी व संत अभ्यासक उपस्थित झाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button