लॉटरी व्यवसाय बंद करन्यास लॉटरी विक्रेत्यांचा विरोध – महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर

मुंबई -दि21 सरकारने लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला आहे.
राज्यातील लॉटरी विक्रेत्यांच्या संघटनानी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात एका जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. ५५ वर्षाचा इतिहास असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारी बाबू बंद करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसापूर्वी लॉटरी छपाई बंद केली आहे. आता पूर्ण व्यवसाय बंद करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आल्याने आम्ही प्रसिद्धी माध्यमातून सरकारला आंदोलनाचा इशारा देत आहोत, असे सातार्डेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य पेपर व ऑनलाईन लॉटरी विक्रेता युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे म्हणाले की, परराज्यात लॉटरी व्यवसाय करोडो रुपयांचा महसूल देत असताना महाराष्ट्रात लॉटरी व्यवसाय बंद पाडण्याचे कारस्थान का रचले जात आहे ? यामागे सरकारचा काही तरी छुपा डाव आहे. यासाठी आम्ही लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहोत. लॉटरी एजन्टचे अध्यक्ष स्नेहल शहा म्हणाले, सरकारने जर महाराष्ट्र राज्य लॉटरीची योग्य प्रकारे जाहिरात केली तर यातून सरकारचा महसूल वाढेल आणि हा व्यवसाय बंद करण्याची सरकारवर वेळ येणार नाही. मात्र सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही हीच खरी शोकांतिका आहे. आज या लॉटरी व्यवसायावर अनेक गोरगरीब, अंध, अपंग, विधवा उदरनिर्वाह करत आहेत.