पुणे शहरात अवैध धंदे बंद असल्याची घोषणा फसवी – रुग्ण हक्क परिषद

दत्ता ठुबे
पुणे – पुणे शहराचे पोलीस आयुक्त प्रचंड कडक शिस्तीचे आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्तांनी संपूर्ण पुण्यातील अवैध धंदे बंद केलेले आहेत. अशा पद्धतीच्या बातम्या वृत्तपत्रातून येत असतात. मात्र प्रत्यक्षात वाहनांची तोडफोड आणि कोयते घेऊन फिरणार यांची संख्या काही कमी होत नाही. रात्रभर धुडगूस घालणाऱ्या या गुन्हेगारांना प्रचंड प्रमाणात दारू उपलब्ध होत आहे. याकडे लपून-छपून का होईना परंतु “अर्थपूर्ण” दुर्लक्ष होत असल्याची टीका रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये यांनी केली.आहे
चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडारवाडी परिसरामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानांमध्ये सर्रास दारू विकली जाते. घराघरात हातभट्टीच्या दारूची विक्री होते. पुणे विद्यापीठ, सिम्बॉयसिस महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, बी एम सी सी, एम एम सी सी महाविद्यालय, बारामती होस्टेल, भारती विद्याभवन या ठिकाणी रात्रभर फिरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक दारूच्या बाटली मागे शंभर दोनशे रुपये जास्त घेऊन हव्या त्या ब्रँडची दारू मुबलक आणि मोठ्या प्रमाणावर रात्रभर मिळते? पहाटे पाच वाजेपर्यंत ही सर्व दुकाने सुरू असतात ही बाब पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना माहित नाही काय? असा सवाल देखील रुग्ण हक्क परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
पुणे मनपाच्या होमी भाभा दवाखान्याजवळ, वडराज तरुण मंडळाशेजारी मटक्याचे धंदे आणि रात्रभर सुरू असणाऱ्या पान टपऱ्यांमध्ये देशी-विदेशी ब्रँडच्या लाखो रुपयांच्या दारूची दररोज रात्रभर उलाढाल होते. स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी अर्ज केल्यानंतर देखील सदर अर्जाला केराची टोपली दाखवली जाते, अशा परिस्थितीमध्ये आता चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यासमोर अवैध धंदे बंद करा, याच एकमेव मागणीसाठी लक्षवेधी धरणे आंदोलन शुक्रवार दिनांक २८ मार्च २०२५ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर अध्यक्ष सौ. अपर्णा मारणे साठ्ये आणि पुणे शहर उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांनी दिली.