राहाता (जिल्हा अहिल्यानगर) येथे महसूल चे राज्यातील पहिले क्यूआर कोड वाचनालय!

मंडळ अधिकारी डॉ. मोहसिन शेख यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
शिर्डी, दि. २६ – महसूल प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिकांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने राहाता मंडळ अधिकारी कार्यालयाने राज्यातील पहिले क्यूआर कोड वाचनालय स्थापन केले आहे. या अभिनव उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने मंडळ अधिकारी डॉ. मोहसिन शेख यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार 2024-25 अंतर्गत शासकीय कर्मचारी गटात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे.
राहाता मंडळ अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या या डिजिटल वाचनालयात महसूलविषयक विविध महत्त्वाच्या पुस्तकांचे क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना ती मोफत वाचता येणार आहेत. या वाचनालयात वारस कायदे, फेरफार नोंदी, महसूल प्रश्नोत्तरे, माहिती अधिकार कायदा, तलाठ्यांची मार्गदर्शिका, ऑनलाईन ७/१२ आणि महसूलविषयक १०१ लेख यांचा समावेश आहे.
नागरिकांसाठी उपयुक्त उपक्रम
क्यूआर कोड वाचनालयामुळे नागरिकांना महसूल कायद्यांबद्दलची माहिती सोप्या भाषेत आणि एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच, पुस्तके डिजिटल स्वरूपात वाचण्याबरोबरच प्रिंट करून संग्रही ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे.
डॉ. मोहसिन शेख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले आहे. यात उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार शशिकांत जाधव आणि मंडळ अधिकारी विनायक यादव यांनी योगदान दिले आहे.
“महसूलविषयक माहिती आणि कायद्याचे ज्ञान सर्वसामान्य नागरिकांना सहज मिळावे, यासाठी क्यूआर कोड वाचनालयाची संकल्पना राबवली. या उपक्रमाचा निश्चितच मोठा लाभ नागरिकांना होईल.”
– डॉ. मोहसिन शेख, मंडळ अधिकारी, राहाताजनसामान्यांसाठी उपयुक्त आणि प्रशंसनीय उपक्रम.”
– डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (सेवानिवृत्त)राज्यातील महसूल प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिकहितकारी करण्याच्या दिशेने राहाता मंडळ अधिकारी कार्यालयाचा हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरेल.