इतर

दीपावली ( दीपोत्सव ) एक आनंदोत्सव


कुणी एका कवीने खालील प्रमाणे दिवाळी या सणाचे वर्णन आपल्या रचनेतुन केले आहे.

“अवनीवरती स्वर्ग अवतरला
दीपवीत साऱ्या तारांगणाला
अमंगळ सारीत महंन्मगला आली
वसुबारस , धनतेरस , नर्कचतुर्दशी
बलिप्रतिपदा अन भाऊबीज बंधुत्वाची
पंचुकली पंचदिनाची आनंदोत्सवी आली

अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा झाली की लगेचच भारतीय सण आणि उत्सव परंपरेतील अत्यन्त मोठ्या आनंदोत्सवी सणाची म्हणजे दिवाळी ( दीपावली ) या पाच दिवसांच्या सणांचा राजा समजल्या जाणाऱ्या उत्सवाची सुरुवात होत असते.
माझ्या या सणांच्या लेखन मालिकेत मी भारतीय हिंदू धार्मिक परंपरेत हे सर्व उत्सव बाराही महिने कसे धार्मिक श्रद्धेने साजरे केले जातात या बद्दल विवेचन केले आहेच.

दीपावली म्हणजे प्राचीनकाली हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. *अंधाराचे काळोखी साम्राज्य दूर सारून सतेज प्रकाशाची उधळण करणारा दीपोत्सव म्हणजे चैतन्यदायी अशा स्वर्गीय मांगल्याचे प्रतीक असलेला आनंदोत्सव समजला जातो.
या उत्सवाची अश्विन महिन्याच्या शेवटी म्हणजेच तिथीनुसार ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये या उत्सवाला सुरुवात होते.

दिवाळी हा सर्वात महत्वाचा मोठा सण मनाला जातो आणि या उत्सवात भारतातील सर्व धर्मीय एकात्मतेने आणि उत्साही वातावरणात मित्रत्वाने साजरा करतात. या दीपावलीच्या पवित्र उत्सवाबाबत अनेक पौराणिक कथा आहेत….


हिंदू धर्मात :- रामायणात 14 वर्षाच्या वनवासानंतर श्री प्रभुरामचंद्र रावणाचा ( दृष्ट प्रवृत्तींचा ) वध करून जेंव्हा अयोद्धेत परतले त्यावेळी तो आनंदोत्सव सर्व प्रजेने विजयोत्सव म्हणून आनंदाने साजरा केला.
तसेच जेंव्हा समुद्रमंथन झाले तेंव्हा त्या आनंदाच्या अनुभूतीतून महालक्ष्मी ( म्हणजे लक्ष्मी ) प्रकट झाली म्हणून हा लक्ष्मीपूजन करून दीपावली उत्सव साजरा केला जातो.

जैन धर्मात :- भगवान महावीरांनी या दीपावलीच्या दिवशीच सर्वसंग परित्याग करून आपले आत्मसमर्पण केले आणि त्यांना मुक्ती प्राप्त झाली म्हणून तेही लोक ही दीपावली अत्यन्त उत्साहाने व श्रद्धेने साजरी करतात.
तिसरी कथा म्हणजे नरकासुर नावाचा खुप दुष्ट आणि प्रचंड शक्तिशाली राक्षस पृथ्वीवरील सर्व जीवांना खूप त्रास देत असे त्याला श्रीकृष्णाच्या सत्यभामेने नरकासुर राक्षसास युद्धात पराभूत केले तो दिवस अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणून त्या नरकासुर या दुष्ट राक्षसाच्या दारुण पराभवी मृत्यूच्या आनंदोत्सवात दिवे लावून साजरा करण्याची प्रथा आहे असे म्हटले जाते. अशा प्रकारच्या कथा ऐकण्यात आहेत.

वसुबारस नंतर पुढे
धनतेरस ( धनत्रयोदशी ) , नरकचतुर्दशीच , लक्ष्मीपूजन , बलिप्रतिपदा (पाडवा ) व नंतर भाऊबीज याप्रमाणे पुढे पाच दिवस हा दिपावलीचा आनंदोत्सव साजरा केला जातो.

वसुबारस :-
म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशी किंवा गोवत्स द्वादशी म्हणून संबोधली जाते आणि त्या दिवसापासू या दिवाळी सणाची सुरुवात होते. भारतीय हिंदू धर्मात गोमातेला ( गायीला ) विशेष महत्व आहे. तिच्या उदरात 33 कोटी देवांचे वास्तव्य असते अशी एक भावनां येथे प्रत्येकाच्या मनात असते तेंव्हा वसुबारसे दिवशी गायीची तिच्या वासरांसह पूजा करण्याची प्रथा आहे तिला गोग्रास म्हणजे ( केळीच्या पानावर ) भोजन देवून घरातील सवाष्ण महिलांनी ओवाळण्याची परंपरा आजही आहे.

धनतेरस ( धनत्रयोदशी ):-
या दिवशी धन्वंतरी देवीचा जन्म झाला म्हणून त्या देवीची पूजा केली जाते. या दिवसापासून पाच दिवस घरात रोषणाई करून आकाश कंदील लावून , आंब्याची पाने लावून ,रांगोळी काढून , फुलांच्या माळा लावून आनंदाने हा पाच दिवसांचा उत्सव केला जातो. या दिवशी आपल्या पारंपरिक धनाची पूजा करून झेंडूची फुले वाहून प्रामुख्याने धने, गूळ , लाह्या , बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. या पूजेने घरातील दारिद्र्य नाहीसे होवून ऐश्वर्य प्राप्त होवुन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही भावनां असते.

नरक चतुर्दशी:-
अश्विन कृष्ण चतुर्दशी या दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरकासुर राक्षसाचा वध झाला म्हणून तो आनंद साजरा करण्यासाठी सर्वांनी पहाटे उठावे अंगाला सुगंधी उटणे , सुगंधी तेल लावून आंघोळ करून शुचिर्भूत व्हावे ओवाळून औक्षण करावे देवाची साग्रसंगीत पूजा करावी , स्तोत्र , गायत्री मंत्राचा जप करावा.
नवीन वस्त्रे परिधान करावीत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत आणि घरात केलेल्या दिवाळी फराळाचा म्हणजे करंजी , लाडु , चकली , चिवडा , शेव , गोडधोड पदार्थांचा आस्वाद सर्वासह घ्यावा आणि हा आनंदोत्सव साजरा करावा.

लक्ष्मीपूजन:-
अश्विन कृष्ण अमावस्या

लक्ष्मीपूजन हा या दिवाळीच्या पाचही दिवसातील तिसरा दिवस मोठा महत्वाचा दिवस मानला जातो . या दिवशी बळीराजाने सर्व देवदेवतांना आणि लक्ष्मीदेवतेलाही बंदिवासात कोंडून ठवले होते तेंव्हा *भगवान विष्णूंनी बटू वामनाचे रूप घेवून बळीराजाला त्रिपाद भूमीचे दान मागितले होते. आणि त्यावेळी विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवतांची सुटका केली होती तो हा म्हणजे सर्व देवगणांचे पृथ्वीवर आगमन झाले आहे असे समजून *अश्विन कृष्ण अमावस्या ( ही शुभ मानली जाते ).*
या दिवशी हिंदुधर्मामध्ये धार्मिक परंपरेप्रमाणे समस्त व्यापारी लोक आपल्या व्यापारी जमाखर्चाच्या वह्या , लेखन साहित्य , यांची श्रद्धेने पूजा करतात. पाटावर किंवा चौरंगावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ ठेवुन , वाटी ठेवून त्यात , सोने , चांदी , मोती , रुपया ठेवून अत्यन्त दिमाखात जल्लोषाने श्रीगणेश , महालक्ष्मीची , माता सरस्वतीची , भगवान कुबेराची पूजा करतात.

बलिप्रतिपदा (पाडवा )
कार्तिक शुद्ध प्रतिपदा

हा दीपावलीचा चौथा दिवस. आणि धर्मशास्त्राप्रमाणे साडेतीन मुहूर्ता पैकी हा अर्धा मुहूर्त मानला गेला आहे .
बळीराजाचे दातृत्व पाहून प्रत्यक्ष भगवंत विष्णूंनी ( वामन अवतारात ) बळीराजाला वरदान दिले की मी तुझ्यासारख्या अलौकिक दात्याची सेवा करण्यासाठी मी तुझा द्वारपाल होईन तो दिवस म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा , ( बलिप्रतिपदा ) पाडवा.
या दिवशी विक्रम संवत सुरू होते
आणि नवीन वर्षाला प्रारंभ होतो. या दिवशी उत्तमोत्तम संकल्प करावेत आणि सर्वांचे जीवन संस्कारीत सुखानंदी आणि कृतार्थ होईल असा प्रयत्न करीत रहावे.

भाऊबीज:-
भाऊबीज हा दिवाळीचा पाचवा दिवस . कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच यमद्वितीया असेही म्हणतात. यमराजाची भगिनी यमुना हिने आपल्या भावाला म्हणजे यमाला आपल्या घरी जेवावयास बोलावले होते तो दिवस म्हणजे “भाऊबीज” म्हणून केवळ भावाबहिणीच्या अतूट प्रेमळ नात्याचा दृष्टांत म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी बहीण भावाला अत्यन्त प्रेमाने ओवाळते. हा दिवस रक्षाबंधना इतकाच पवित्र आणि महत्वाचा समजला जातो.
अशा तऱ्हेने हा पाच दिवसीय आनंदोत्सवी दिवाळी सोहळा भारतातच नव्हे तर जगातील सर्वच भारतीय विविध जातीधर्माचे लोक साजरा करत असतात.
आता या वैज्ञानिक युगात वातावरणात खूप बदल जरी होत असले तरी भावनिक , धार्मिक , सामाजिक , सांस्कृतिक दृष्टीने समतोल विचार करून हे सर्वच सण आणि उत्सव सर्वार्थाने प्रदूषणमुक्त कसे होतील याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे .
हे मात्र तितकेच खरे…!!

वि.ग.सातपुते.(साहित्यिक )
संस्थापक अध्यक्ष:-
महाकवी कालिदास प्रतिष्ठान
पुणे ,मुंबई ,ठाणे मराठवाडा ,महाराष्ट्र.
📞( 9766544908 )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button