बीज मातेची गावरान बियाणे निर्मितीची जैयत तयारी ….

अकोले प्रतिनिधी
गावरान आणि देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी गावरान बियाण्यांची निर्मिती व प्रचार प्रसार यांच्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. खरीप हंगामात लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकांच्या बियांची सध्या काढणी आणि उन्हामध्ये वाळवणी या कामांना वेग आला आहे. बीज माता स्वतः शेतामध्ये वेळ देऊन शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे निर्माण करण्यामध्ये व्यस्त आहेत. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी दर्जेदार गावरान बियाणे निर्मितीवर भर दिला आहे त्यांनी त्यासाठी जोरदार मोहीम आपल्या कुटुंबीयांसहित हाती घेतली आहे. वाल , घेवडा व वाटाणा यांच्या सुमारे 23 वाणांची लागवड यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी केली होती. अत्यंत दर्जेदार व सकस बियाणे सध्या त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. राज्य आणि परराज्यातील अनेक शेतकरी येथील बीज बँकेला भेट देऊन विविध बियाणे दरवर्षी खरेदी करत असतात. अकोले तालुक्याचे नाव देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गावरान बियांच्या निर्मितीसाठी आता ओळखले जाऊ लागले आहे. वांगी , टोमॅटो, मिरची, काकडी ,दुधी भोपळा, खरबूज ,कारले, लाल भोपळा ,घोसाळी ,दोडका गवार, भेंडी, मुळा, शेपू अशा विविध पिकांचे अस्सल देशी वाण त्यांच्याकडे तयार करण्यात आले आहेत. देशातील शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध कार्यक्रमातून देशी बियाण्यांचा प्रचार व प्रसार वर्षभर राहीबाई करत असतात.

नुकत्याच त्या तेलंगाना राज्यात जाऊन आल्या. तेलंगणा बायोडायव्हर्सिटी बोर्ड आयोजित आंतरराष्ट्रीय महोत्सवाला त्यांनी नुकतेच संबोधित केले. याशिवाय गोवा गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश कर्नाटक इत्यादी राज्यातूनही त्यांच्या बियाण्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. वाढती मागणी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत अस्सल गावरान बियाणे पोहोचवण्यासाठी बीजमाता सरसावल्या आहेत. शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक संकुले ,कृषी विद्यापीठ,कृषी संशोधन केंद्र , शेतकरी गट , शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून गावरान बियाणे चळवळीला मोठे करण्यासाठी त्यांच्याकडून भरीव योगदान देण्यात येत आहे.