रोटरी च्या पुढाकाराने महिरावणी येथे नंदिनी नदी पुनर्जीवीकरण अभियान!

नाशिक प्रतिनिधी
एकेकाळी नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासात मानाचा स्थान असलेली नंदिनी नदी आज मात्र गलिच्छ नाल्यात रूपांतरित झाली आहे….. या नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे कार्य खूप जिकरीचे आणि खर्चिक असते.. रोटरी क्लब ऑफ नासिक ने अक्रोन प्लास्ट लिमिटेड कडून मिळालेल्या सीएसआर निधीच्या माध्यमातून हे प्रकल्प हाती घेतले आणि त्याचे दृश्य परिणाम लगेचच दिसू लागले आहेत.
23 मार्च रोजी रोटरी क्लब ऑफ नासिक च्या 80 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरीचे डिस्ट्रिक्ट प्रांतपाल राजेंद्र सिंह खुराणा यांच्या हस्ते या मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
या संबंधित कार्यासाठी बेळगाव ढगा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ढगे आणि महिरावणी येथील सरपंच आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे पाठपुरावा केला. याआधीही रोटरी क्लब ऑफ नासिक ने बेळगाव ढगा या गावी हाती घेतलेल्या पाझर तलाव खोलीकरण कार्यामुळे येथील छोट्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होऊन इथल्या ग्रामस्थांना खूप लाभ झाला आहे. योग्य वेळी हे काम हाती घेतल्यामुळे याचे दृश्य परिणाम लवकरच येणाऱ्या पावसाळ्यात दिसून येतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या नदी पुनर्जीवीकरण कार्यामुळे ही नदी पुन्हा पूर्वीसारखी प्रवाहित होणार असून नदीकाठी असणाऱ्या शेतजमिनींसाठी पाणी तर उपलब्ध होईलच पण येथील पाण्याच्या भूपातळीतही नक्कीच वाढ होईल. हा प्रकल्प रोटरी साठी आस्थेचा विषय असून आम्ही हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी आमच्या पूर्ण क्षमतेचा वापर करू असे आश्वासन रोटरीचे अध्यक्ष ओम प्रकाश रावत व प्रकल्प सचिव प्राध्यापक हेमराज राजपूत यांनी दिले. याप्रसंगी रोटरी सचिव शिल्पा पारख, उपप्रांतपाल ओंकार महाले,विनायक देवधर , सुजाता राजेबहादुर, श्रीविजय पंडित, वैशाली रावत , सरपंच श्री कचरू वागळे,उपसरपंच श्री सोमनाथ खांडबहाले, ग्रामसेविका मोरे मॅडम, श्री समाधान खांडबहाले, सोमनाथ खांडबहाले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोटरी क्लब नाशिकच्या वतीने दरवर्षी ग्रामीण भागातील नदी नाले ओहोळ बंधारे यातील गाळ काढून पाणीसाठा वाढवण्याचे काम केले जाते. यामुळे भूजल पातळीत वाढ होऊन शेतकरी पशुपक्षी प्राणी व पर्यावरण संवर्धनासाठी फायदा होतो. यावर्षी या कामासाठी अंजनेरी इथून उगम पावणारी नंदिनी नदी पुढे महिरावणी गावातून येते. या गावाजवळ मोठ्या प्रमाणात गाळ सचून पाणीसाठा कमी झालेला आहे.
वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या कार्याला रोटरीचा हातभार लागला याबद्दल सर्व मान्यवरांनी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे भरभरून कौतुक केले.