पारनेर तालुक्यातील दरोडी येथे हजरत पीर शेख यांचा उरुस गुरुवार पासून सुरू

दत्ता ठुबे
पारनेर – सर्व धर्मियांचे ऐक्याचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या पारनेर तालुक्यातील दरोडी येथील किबला हजरत पीर शेख बाहुद्दीन चिश्ती रहे. यांचा उरूस गुरुवार दि. ३ पासून मोठया उत्साहात सुरु होत असून ४ दिवस चालणाऱ्या या उरुसाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हिंदू व मुस्लिम भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी करतात, अशी माहिती मुख्य ट्रस्टी अनवर मुजावर यांनी दिली आहे .
पारनेर – अळकुटी मुख्य रस्त्यावरील रांधे फाट्यापासून अवघे ३ किलोमीटर , तर लोणी मावळा येथून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ३ ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या दरोडी या छोट्या गावात डोंगराच्या पायथ्याशी हिरव्यागार झाडीत पीरसाहेबांची दर्गा आहे. पीर शेख बाहुद्दीन चिस्ती यांचा दर्गा असलेली ही वास्तू ८३० वर्षांपूर्वीची असून पीर साहेबांचे वर्षातून २ दा उरूसाचा कार्यक्रम होतात. पहिला उरूस पीरसाहेबांनी समाधी घेतली त्या तारखेला म्हणजे दरवर्षी उर्दू ता. ४ शाबानला होतो. हा उरूस फक्त १ च दिवस असतो. दुसरा उरूस हिंदू पंचांगाप्रमाणे पाडवा चैत्र शुद्ध एकपासून ५ व्या दिवशी सुरू होतो. हा उरूस ४ दिवसांचा असतो. या उरूसासाठी राज्यातील अनेक ठिकाणांहून हिंदू-मुस्लिम भाविक येतात. ४ दिवस चालणाऱ्या उरुसात गुरुवार दि. ३ पंचमीला संदल, शुक्रवार दि. ४ षष्टीला चिराग, शनिवार दि. ५ सप्तमीला भर यात्रेला कंदोरी , रविवार दि. ६ अष्टमीला फुट पानफूल यात्रा होते. या उरूसास हिंदू-मुस्लिम समाजाच्या मोठ्या प्रमाणावर कंदोऱ्या होतात. लोक नवस फेडण्यासाठी येथे हजेरी लावतात.
या ४ दिवसांत नगर, पुणे, नाशिक, मुंबई व राज्यातील प्रत्येक ठिकाणावरून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दिवसेंदिवस येथील भाविकांची गर्दी वाढत आहे. भाविकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व स्थानिक प्रशासनाच्या वतीने पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहाची सुविधा व दुकानदारांसाठी जागा उपलब्ध करून देणे , जागेची साफसफाई , दर्गाह परिसर स्वच्छ करणे , रंगरंगोटी , दुचाकी – चार चाकी वाहने उभी करण्याची जागा ही कामे भागा कड , दत्ता कड आणि ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आलेली आहे.
पाण्याची व्यवस्था प्रत्येक वर्षां पासून रांधेचे सरपंच संतोष काटे यांचे वतीने करण्यात येते.या उरुसास दरोडी येथे येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने पारनेर, कल्याण, शिरूर, आळेफाटा येथून एस टी बसेसची सुविधा उपलब्ध केली असून यात्रा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारनेरचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेवून उरुसाचा
आनंद घेण्याचे आवाहन दर्गाह ट्रस्टी छबुलाल शेख, याकुब शेख, शरीफ शेख, अमिर शेख तसेच दरोडी ग्रामस्थांनी केले आहे.
रामनमवीला कंदोरी नाही –
या उरुसासाठी राज्यभरातून येणारे लाखो भाविक नवसपूर्तीसाठी कंदोरी करत असतात पण रविवार दि. ६ रोजी रामनवमी असल्याने या दिवशी कोणतीही कंदोरी होणार नसून भाविकांनी दि. ४ व ५ रोजी कंदोरी करण्याचा निर्णय दर्गाह ट्रस्ट कमिटीने घेतला आहे व सगळीकडेच पाणी टंचाईचे संकट असतानाही भाविक , यात्रेतील दुकानदारांची पिण्याचे व वापराच्या पाण्याची गैरसोय होवू नये , म्हणून दर्गाह ट्रस्ट मार्फत टँकरव्दारे पाण्याचे नियोजन करण्यात आले असून उन्हाळी दुष्काळी परिस्थिती त पाण्याची जाणीव ठेवत भाविक, दुकानदार व स्थानिक ग्रामस्थांनीही पाणी वाया न घालवता पाण्याचा योग्य वापर करावा , दर्गाह व यात्रा परिसरात स्वच्छता राखावी ,असे आवाहन दर्गाह ट्रस्ट कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
या ऊरुसासाठी दरोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.जयश्री चौधरी,उसरपंच मुहन्मद मुजावर , माजी सरपंच अनिल पावडे , सदस्य , तंटा मुक्ती समितीचे पदाधिकारी , सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ एकोप्याने राहून मोठ्या दिलाने मदत करतात , हे या ऊरुसाचे खास वैशिष्टे म्हणावे लागेल .