बस सेवा पूर्ववत करा; अन्यथा आंदोलन करू : प्रियंका खिलारी

दत्ता ठुबे/पारनेरप्रतिनिधी :
तालुक्यातील ग्रामीण भागा मध्ये अनेक प्रवाशांची विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची गैरसोय होत असून बस सेवा पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी यांनी पारनेर आगार प्रमुख पराग भोपळे यांना दिले आहे. तालुक्याच्या पठार भागावरील कान्हूर पठार, गारगुंडी, पिंपळगाव रोठा, कारेगाव, नांदूर पठार या भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे पारनेर कान्हूर पठार या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात तसेच अनेक ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग पारनेर शहर, कान्हूर पठार, टाकळी ढोकेश्वर या बाजारपेठेच्या ठिकाणी खरेदीसाठी येत असतात त्यांची येण्या जाण्याची होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी बस सेवा पूर्ववत करावी. अशी मागणी खिलारी यांनी केली आहे. निवेदनामध्ये खिलारी यांनी म्हटले आहे की पिंपळगाव रोठा पासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कारेगाव या ठिकाणी बस जात नाही कान्हूर पठार, गारगुंडी, पिंपळगाव रोठा, कारेगाव, नांदूर पठार असा बसचा मार्ग करण्यात यावा त्यामुळे त्या भागातील लोकांची गैरसोय होणार नाही.तसेच तालुक्याच्या उत्तर भागातील शेवटचे टोक असलेल्या वनकुटे येथे येणारी मुक्कामी बस सेवा बंद आहे. त्या भागातील शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची येण्या जाण्याची गैरसोय होत आहे हे लक्षात घेऊन पारनेर आगाराने त्वरित कारवाई करून बस सेवा सुरू करावी अन्यथा आम्हाला शाळकरी विद्यार्थी व प्रवासी ग्रामस्थांसह पारनेर आगारासमोर उपोषणाला बसावे लागेल. असे शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख प्रियांका खिलारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना खिलारी म्हणाल्या की महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी एसटी बसचा मोठा वाटा आहे. पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे संकट दूर झालेले असतानाही एसटी महामंडळाने बस सेवा अजूनही पूर्वत केलेली नाही ही खेदाची बाब आहे. तरीही एसटी महामंडळ प्रशासनाने लवकरात लवकर तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल. यावेळी त्यांच्या समवेत युवा सेना तालुका उपप्रमुख अमोल ठुबे, संतोष तांबे, कारेगाव शिवसेना शाखाप्रमुख शरद जगदाळे, कारेगाव उपसरपंच अशोक पंडित, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम घुले आदी ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.