महापालिका परिचारिकांसाठी पाच दिवसांचा आठवडा होणार,

मुंबई दि16
🔸मुंबई महानगरपालिकेच्या परिचारिकांना आता पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले आहे. कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली आज पालिकेच्या ‘एफ/साऊथ’ विभाग कार्यालयावर शेकडो परिचारिकांनी धडक देत जोरदार आंदोलन केले.
राज्य सरकारच्या धर्तीवर पालिकेतील परिचारिकांना पाच दिवसांचा आठवडा, आठवडय़ातून दोन दिवस रजा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र याची प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. या पार्श्वभूमीवर आज सर्व रुग्णालयांतील परिचारिकांनी एफ/दक्षिण विभाग कार्यालयावर धडकल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. यावेळी मुंबई पालिकेच्या सर्व रुग्णालयांत परिचारिकांना 5 दिवसांचा आठवडा, आठवड्याला 2 रजा लागू करण्याचा प्रस्ताव त्वरित पाठवून 2 दिवसांत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी वर्गाची मान्यता घेण्यात येईल, असे आश्वासन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे व प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या ठाकूर यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
बैठकीतील चर्चेनुसार 22 मे 2023 पासून 5 दिवसांचा आठवडा लागू न झाल्यास परिचारिकांनी तात्पुरते स्थगित केलेले आंदोलन अधिक तीव्र करून सामुदायिक रजा आंदोलन करण्यात येईल असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस ॲड. रचना अग्रवाल यांनी दिला. यावेळी चिटणीस हेमंत कदम, संजय वाघ, वृषाली परुळेकर, अजय राऊत, संदीप तांबे, महेश गुरव, अतुल केरकर, रामचंद्र लिंबारे, मंगल तावडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, सल्लागार हरिष जामठे आदी उपस्थित होते.