निलम गोऱ्हे यांचा शिवसेनेत प्रवेश! शिंदेंसह फडणवीसांची उपस्थिती; अविश्वास ठराव मागे…

मुंबईः ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखेर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आज सकाळपासूनच त्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरु होती. अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी भगवी शाल देऊन नीलम गोऱ्हे यांचं शिवसेनेत स्वागत केलं.
पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची भूमिका विषद केली. आपली कोणतीही नाराजी नाही, असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र त्या बंडानंतरचा हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत.
नीलम गोऱ्हे ह्या केवळ एक राजकीय नेत्या नाहीत तर त्यांनी उपेक्षित, पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलेलं आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितलं जातं. आजचा त्यांचा निर्णय हा ठाकरे गटातली उरली सुरली नाराजी चव्हाट्यावर आणणारा आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने ठाकरेंना धक्का बसला आहे.
नीलम गोऱ्हे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेण्यात येणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी असा प्रस्ताव मांडला. त्याला प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आहे.
उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी विरोधीपक्ष नेते असताना केला होता. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा असा प्रस्ताव दरेकर यांनी मांडला आहे.
पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गावर जात असून त्यांच्यासोबत मी जात आहे
१९९८ साली मी बाळासाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता
या सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतली राम मंदिर, ट्रिपल तलाख, ३७० कलम.. यासारखे अनेक निर्णय एनडीएने घेतले
राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व यावर हा पक्ष पुढे जात आहे
पक्षावर माझी नाराजी नव्हती. सटरफटर लोक आल्याने नाराजी होत नसते