साताऱ्याच्या दोघांकडून अहिल्यानगर शहरात 11 लाखाची रोकड जप्त!

अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने पोलिसांच्या एका विशेष पथकाने अहिल्या नगर शहरातील गंजबाजार परिसरात छापा टाकला या छाप्यात पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून 11 लाख 78 हजार 400 रूपयांची बेहिशोबी रोकड, मोबाईल, नोटा मोजण्याचे मशीन असा एकुण 12 लाख 39 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त रोख रक्कमे बाबत दोघां कडून समाधानकारक उत्तर न दिल्याने दोघांवर मुंबई पोलीस कायदा कलम 124 अंतर्गत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहीत अशोक बोबडे (वय 29) व आकाश अशोक बोबडे (वय 27, दोघे रा. घाडगेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस अंमलदार मलिकार्जुन बनकर यांनी फिर्याद दिली आहे. फलटण येथील दोन व्यक्ती बेहिशोबी रोकड घेऊन गंजबाजार येथे येणार आहेत, अशी माहिती अधीक्षक घार्गे यांना मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक इसामोद्दीन पठाण, पोलीस अंमलदार शकिल शेख, बनकर, अमोल कांबळे, अक्षय भोसले व शुभम लगड यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. पोलीस पथकाने पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून गुरूवारी (12 जून) दुपारी 3.35 वाजता गंजबाजारातील कृष्णा टॉवरजवळ दोघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी आपली नावे रोहीत अशोक बोबडे व आकाश अशोक बोबडे अशी सांगितली. त्यांच्याकडे 11 लाख 78 हजार 400 रूपयांची रोख रक्कम, नोटा मोजण्याची मशीन, मोबाईल आढळून आले.
दरम्यान, रोख रक्कमेसंदर्भात समाधानकारक उत्तर देण्यात दोघे संशयित अयशस्वी ठरले. त्यामुळे पंचांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.