आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
– आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी पतसंस्था, राजूरची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता ॲड. एम. एन. देशमुख महाविद्यालय, राजूर येथील सभागृहात चेअरमन श्री गंगाराम करवर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही, पारदर्शक आणि एकात्मतेच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडली.
सभेची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली. प्रास्ताविक संचालक श्री किशोर शिंदे यांनी केले, तर सचिव श्री रावजी भोर यांनी संस्थेचा वार्षिक अहवालाचे वाचन केले
सभेत चेअरमन श्री गंगाराम करवर यांनी मनोगतातून संस्थेच्या प्रगतीचा, आर्थिक कामगिरीचा आणि विविध उपक्रमांचा सखोल अभ्यासपूर्वक निर्णय सभासदांना समजावून सांगितला. संस्थेचे नाव बदलून आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी पतसंस्था मर्या., अहिल्यानगर असे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि सभासदांच्या सर्व शंकांचे समाधानकारक निरसन केले.
श्री करवर यांनी सांगितले की, संस्थेने कमी व्याजदर, जास्त कर्जवाटप, स्वमालकीची इमारत, तसेच पारदर्शक कारभाराच्या बळावर आदिवासी विकास विभागातील महाराष्ट्रातील आदर्श पतसंस्थेचा मान पटकावला आहे. संस्थेचे कॅश क्रेडिट झिरो झाल्याची आनंददायक माहिती त्यांनी दिली. ठेवी वाढवून आणि कॅश क्रेडिटवर अवलंबित्व कमी करून यावर्षी 12% लाभांश वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करताच सभासदांनी टाळ्यांच्या गजरात संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
सभेत संस्थेच्या नवीन अद्ययावत सॉफ्टवेअरची उपलब्ध करून . सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सभासदांना फोन पे, नेट बँकिंगद्वारे आपले शेअर्स, वर्गणी आणि व्यवहार तपशील मोबाईलवर सहज पाहता येणार आहेत. संस्थेच्या मयत निधीतून सर्व सभासदांसाठी टर्म इन्शुरन्स काढण्यात येणार असून, कर्ज नसलेल्या मयत सभासदांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत आणि जमा वर्गणी ठेव व शेअर्स परत दिले जाणार आहेत. तसेच कर्जदार मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ करून जमा वर्गणी ठेव आणि शेअर्स त्यांच्या वारसांना परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात येत आहे हि माहिती चेअरमन श्री करवर यांनी दिली.
संस्थेचे शैक्षणिक व तातडी कर्ज 7% दराने आणि कायम जामीन कर्ज 8.25% दराने देण्यात येत असून, हा व्याजदर आदिवासी विकास विभागात प्रथम क्रमांकाचा आहे व संपूर्ण जिल्ह्यात सर्व पतसंस्थेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची पतसंस्था म्हणून संस्थेचा लौकिक आहे, असे त्यांनी नमूद केले.
सभेमध्ये सेवानिवृत्त सभासद, शाळेचे डीडीओ आणि प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री मनोज पैठणकर यांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. सूत्रसंचालन श्री प्रमोद राऊत यांनी केले, तर आभार संचालक श्री अविनाश बनसोडे यांनी मानले. सभेची सांगता वंदे मातरम गाण्याने झाली.
अशा प्रकारे आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी पतसंस्था, राजूरची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली.