शिक्षण प्रक्रियेत नियोजन आणि सातत्य ठेवल्यास यश प्राप्त होते. – शिक्षणाधिकारी श्री.भास्कर पाटील

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगाव येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
शेवगाव /प्रतिनिधी
जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती शिक्षण विभाग शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगाव येथे इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेसाठी तालुक्यातील इयत्ता 5 वी व 8 वीला मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यशाळेला अहिल्यानगर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.भास्कर पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी सौ.जयश्री कार्ले मॅडम यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.

सन 2023 -24 या शैक्षणिक वर्षापासून अहिल्यानगर जिल्हा परिषदेने मिशन आरंभ हा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस सदर उपक्रमामुळे मदत झालेली आहे.

शिक्षणाधिकारी श्री.भास्कर पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना अनेक मुद्द्यांना स्पर्श करून दिशादर्शिकेची योग्य अंमलबजावणी, सातत्य आणि सराव,
पालकांशी सातत्याने समन्वय ठेवून झालेल्या सराव परीक्षेचे विचार मंथन करावे, मिशन आरंभ अंतर्गत होणाऱ्या सराव चाचणीचे विद्यार्थी निहाय व प्रश्न निहाय विश्लेषण करण्यात यावे, 9.30 ते 10.30 या वेळेत जादा तासिका घेऊन पूरक मार्गदर्शन करावे,शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये कसे येतील या दृष्टीने शाळा पातळीवर नियोजन करावे तसेच जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी हे ग्रामीण भागातील विद्यार्थी असून त्यांचे भविष्य उज्वल कसे करता येईल त्या दृष्टीने शिक्षकाने कंबर कसून शैक्षणिक कार्य करून आपल्या समोर बसलेल्या लेकरांचे भविष्य उज्वल घडवावे असे आवाहन याप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री भास्कर पाटील यांनी केले.
याप्रसंगी विस्तार अधिकारी( शिक्षण) जयश्री कार्ले यांनी मागील वर्षी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रत्येक शाळेचा शिष्यवृत्ती निकालाचा आढावा घेत पूरक मार्गदर्शन केले.
यावेळी शेवगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ, त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे प्रमुख बाळासाहेब कोकरे, प्राचार्य शिवाजीराव काटे, विस्तार अधिकारी( शिक्षण) डॉ.शंकर गाडेकर, उद्धव बडे,केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे, विष्णू गायकवाड, गटसाधन केंद्राचे सर्व विषयतज्ञ उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी सुलभक म्हणून श्री सुनील पायमोडे, कुशाबा पलाटे, गोरक्षनाथ दुसुंगे आणि निलेश दौंड यांनी शिष्यवृत्ती विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिष्यवृत्ती समन्वयक देवीदास खडके यांनी केले.