सेंद्रिय शेती तज्ञ संपतराव वाकचौरे कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित…

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील वाशेरे गावचे सुपुत्र व सेंद्रिय शेतीसाठी राज्यभर महत्त्वपूर्ण चळवळ राबवणारे आदर्श शेतकरी आणि सेंद्रिय शेती तज्ञ संपतराव वाकचौरे यांना नुकतेच कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संगमनेर येथे झालेल्या इनरव्हील क्लबच्या वार्षिक कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर दुर्गाताई तांबे , डॉक्टर जयश्री थोरात , इनर व्हील क्लबच्या अध्यक्ष नेहा सराफ , तसेच कार्यकारी सदस्य सपना नावंदर , रचना मालपाणी , वैशाली चोपडे , वैशाली खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.
संपतराव वाकचौरे यांनी सेंद्रिय शेतीची चळवळ राज्यभर घेऊन जाण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यासोबत त्यांनी राज्यातील विविध भागात जाऊन सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना समजेल अशा व अत्यंत सोप्या पद्धतीने सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा घरच्या घरी तयार करण्याचे प्रशिक्षण केंद्र आपल्या राहत्या घरी वाशेरे येथे स्थापन केलेले आहे.
गांडूळ खत आणि गांडूळ कल्चर निर्मिती केंद्र महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने ते चालवतात. दरवर्षी शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाचे गांडूळ खत आणि गांडूळ पाणी तसेच गांडूळ कल्चर त्यांच्या वाशेरे येथील केंद्रातून उपलब्ध करून दिले जाते. याव्यतिरिक्त दशपर्णी अर्क , जीवामृत, बीजामृत , फुल शेती , फळ शेती , भाजीपाला शेती आणि उत्कृष्ट दर्जाची परसबाग त्यांनी आपल्या घरी फुलवली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा आदर्श घेत देशी बी बियाणे संवर्धनाची कास धरत आपल्या राहत्या घरी शेतकऱ्यांसाठी गावरान बियांची बीज बँक त्यांनी स्थापन केली आहे. त्यांनी सेंद्रिय शेतीसाठी राबवलेले प्रयोग राज्यात व राज्य बाहेरही प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या या कामाची नोंद घेऊन संगमनेर येथील इनर व्हील क्लब ने त्यांना कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांना मिळालेल्या कृषिरत्न पुरस्काराबद्दल त्यांचे बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे , महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर दशरथ बंगाल, बायफ संस्थेचे गुजरात राज्याचे अतिरिक्त राज्य समन्वयक जितीन साठे , भाऊसाहेब खरात , तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी , आत्माचे तालुका समन्वयक बाळनाथ सोनवणे , कृषी अधिकारी गोरडे मॅडम ,वनौषधी तज्ञ प्राध्यापक रामलाल हासे, पर्यावरण तज्ञ रमाकांत डेरे , प्रगतशील शेतकरी बबनराव शेटे, बादशहा नवले , राजाराम लांडे , पूंजीजीराम वाकचौरे , भागवतराव वाकचौरे , सुभाष पोखरकर , तुकाराम धुमाळ , दत्तात्रय वाकचौरे , शिवाजी आवारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.