भारतीय मजदूर संघाने जगातील कामगार चळवळीला दिशा द्यावी. – सरसंघचालक श्री मोहन भागवत

BMS च्या ७० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा भव्य समारोप.
नवी दिल्ली – भारतीय मजदूर संघाने आपल्या रीती, नीती आणि कार्यपद्धतीतून जगात एक आदर्श स्थापन केलेला आहे. कामगार हित, उद्योग हित, आणि राष्ट्रहिताच्या पुढे जाऊन विश्वहिताची भूमिका भारतीय मजदूर संघाने घ्यावी आणि जगातील कामगार चळवळीला दिशा द्यावी असे प्रतिपादन माननीय सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी केले.
सत्तर वर्षाच्या कार्याचा आनंद व्यक्त करत असताना आपण हूरळून न जाता, सिंहावलोकन करत आपल्या लक्ष्याकडे अग्रेसर व्हावे असे मार्गदर्शन त्यांनी केले. भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्षानिमित्त दिल्ली येथे आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.
भारतीय मजदूर संघाने आपल्या स्थापनेच्या ७० वर्षपूर्ती निमित्त वर्षभर संपन्न झालेल्या कार्यक्रमांचा भव्य समारोप सोहळा २३ जुलै २०२५ रोजी नवी दिल्लीतील के. डी. जाधव कुस्ती हॉल, इंदिरा गांधी स्टेडियम येथे साजरा केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री श्री. मनसुख मांडविया, माजी सहसरकार्यवाह माननीय श्री भागेय्याजी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी BMS चे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. हिरण्मय पंड्याजी होते.

या कार्यक्रमाला दिल्लीच्या मुख्यमंत्री माननीय श्रीमती रेखा गुप्ता, दिल्लीचे कामगार मंत्री श्री कपिल मिश्रा, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री श्री संतोषजी, संघाचे विविध पदाधिकारी, ILO च्या डायरेक्टर Ms Michico Miyamoto (Japan), हिंद मजदूर सभा, आयटक, इंटक , AICCTU , या केंद्रीय कामगार संघटनांचे पदाधिकारी, नेपाळमधील कामगार संघटनेचे पदाधिकारी, FICCI, CII या उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी , आणि देशभरातील भारतीय मजदूर संघाच्या राज्यांचे अध्यक्ष, महामंत्री, अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष, महामंत्री, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य, त्याशिवाय दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील सुमारे आठ हजार कामगार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात BMS दिल्ली प्रांताच्या अध्यक्षा सौ. इन्दु जम्वाल यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी सर्व उपस्थितांचे मन:पूर्वक स्वागत केले. १९६७ मध्ये दिल्ली येथे प्रथम अधिवेशन पार पडले होते. आज BMS – ७० वर्षे पूर्तीचा कार्यक्रम येथे होत आहे हा सर्व कार्यकर्त्यांसाठी गौरवाचा क्षण आहे.
अखिल भारतीय महामंत्री श्री. रविंद्र हिमते यांनी वर्षभरात पार पडलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना स्पष्ट केले की भारतीय मजदूर संघाने गेल्या सात दशकांत कामगारांच्या हक्कांसाठी लढा देताना संघटनेचा विस्तार व वैचारिक स्पष्टता कायम राखली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, हा समारोप म्हणजे शेवट नव्हे, तर पुढच्या टप्प्याचा आरंभ आहे, संघटनेची वाटचाल अखंड सुरूच राहणार आहे. श्री. हिमते यांनी संघटनेच्या उभारणीत आपले जीवन अर्पण करणाऱ्या थोर विभूतींना आदरांजली अर्पण केली व उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्ते श्री हसूबाई दवे, श्री सामा बाल रेड्डी, श्रीमती गीता ताई गोखले, श्री वसंतराव पिंपळापुरे, श्री करतारसिंग यांचा सत्कार केला. २३ जुलै २०२४ रोजी ७० व्या वर्ष कार्यक्रमाची सुरुवात ऐतिहासिक स्थापना स्थळ भोपालमधूनच झाली होती. पारदर्शकता, सामूहिक निर्णय प्रणाली आणि पक्षीय राजकारणापासून दूर राहण्याचा निर्धार हीच संघटनेच्या यशाची गुरुकिल्ली आहे.
BMS चे अध्यक्ष श्री. हिरण्मय पंड्या यांनी अध्यक्ष भाषण केले. १९८९ पूर्वी भारतीय मजदूर संघ दुसऱ्या क्रमांकावर होता, त्यानंतर भारतातील प्रथम क्रमांकाची सर्वाधिक सदस्य असलेली श्रमिक संघटना बनली. BMS केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही सशक्तपणे काम करत आहे. G-20 च्या अंतर्गत L-20 मध्ये BMS ने नेतृत्व करून जगाला भारतीय श्रमिक विचारांची ओळख करून दिली. आज BMS २८ राज्यांत, ४४ महासंघांत आणि ६६३० संघटनांतून सक्रिय आहे. नेपालमध्येही BMS चे कार्य सुरू आहे, हे संघटनेच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराचे लक्षण आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह श्री. भागेय्याजी यांनी , हा कार्यक्रम केवळ उत्सव नाही तर विचारप्रवाह आणि चळवळीचे प्रतीक आहे, आज BMS चे स्वरूप समाजाच्या कार्यक्रमात रूपांतरित झाले आहे असे प्रतिपादन केले.
विशिष्ट अतिथी केंद्रीय मंत्री माननीय श्री. मनसुख मांडवियाजी यांनी BMS च्या कार्यपद्धतीचे कौतुक करत म्हटले की,BMS चे कार्य प्रेरणादायी आहे. ७० वर्षांच्या प्रदीर्घ काळात BMS देशातील सर्वात मोठी आणि जागतिक पातळीवर महत्त्वाची संघटना बनली आहे. जगात BMS ला मान आणि मान्यता प्राप्त होत आहे. भारतीय मजदूर संघाच्या विचाराने कामगार देशाच्या विकासात मोलाचा सहभाग देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात महाराष्ट्रातून श्री अण्णा धुमाळ , अनिल ढुमणे, किरण मिलगीर , CV राजेश, मोहन येनुरे, रामनाथ किणी, शर्मिला पाटील, तृप्ती आलती, रवींद्र देशपांडे, संतोष गदादे विराज टिकेकर, सचिन मेंगाळे, सुरेश पाटील, मंगेश देशपांडे, जयंतराव देशपांडे यासह विविध उद्योगातील सुमारे 50 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात इ कार्यकर्ता हे पोर्टल प्रकाशित करण्यात आले. त्याचबरोबर भारतीय मजदूर संघाच्या कार्याची माहिती देणारी छोटी फिल्म प्रदर्शित करण्यात आली. तसेच ऑर्गनायझर या मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशन माननीय डॉ. श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भारतीय मजदूर संघ दिल्ली प्रदेशाचे महामंत्री डॉक्टर श्री दिपेंद्र चहार यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.