इतर

शनिवार वाडा ते एस.पी. कॉलेज रॅलीने भारतीय मजदूर संघाचा ७० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

पुणे -देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनांपैकी एक असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या (BMS) ७० व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार, दि. २३ जुलै २०२५ रोजी शनिवार वाडा ते एस.पी. कॉलेज या दरम्यान भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर एस.पी. कॉलेज येथील लेडी रमाबाई हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्याचे अध्यक्षीय भाषण पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले. पुणे जिल्हा सचिव सागर पवार यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा सादर करताना, वर्धापन वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ म्हणाले –
“असंघटित क्षेत्रातील कोट्यवधी कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी भारतीय मजदूर संघ गावागावात जाईल. कामगारांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम आम्ही ताकदीनं करू.”
पुणे जिल्हा सचिव सागर पवार यांनी मांडलेले ठळक मुद्दे:

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी विस्तार मोहिमा राबविणे.

नवीन युवकांना संघटनेत सहभागी करून नेतृत्व विकसित करणे जिल्हास्तरावर नियमित प्रशिक्षण शिबिरे घेणे.
भारतीय मजदूर संघ अध्यक्ष पुणे
अर्जुन चव्हाण यांच्या अध्यक्षीय भाषणातील मुद्दे:
“कामगारांना फक्त काम नाही, तर प्रतिष्ठाही मिळायला हवी. संघटनात्मक ताकद वाढली तर सरकारला निर्णय घ्यावे लागतील.
भारतीय मजदूर संघ ही संघटना केवळ मागण्या करणारी नसून कामगारांसाठी कृती करणारी संघटना आहे.”

मेळाव्यात मांडलेल्या कामगार मागण्या:

वेतन कोड व सामाजिक सुरक्षा कोड तातडीने लागू करणे आणि इतर २ लेबर कोडमध्ये दुरुस्ती करणे.

कंत्राटी कामगारांना वेतन सुरक्षा, सामाजिक सुरक्षा आणि रोजगारात स्थैर्य देण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय करावा.

ईपीएफ ९५ पेन्शनधारकांना दरमहा ₹५,००० व महागाई भत्ता जोडणे.

ईएसआयसीचे सिलिंग ₹४२,००० करणे आणि पुण्यातील ईएसआयसी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू करणे.

प्रत्येक कामगारासाठी प्रति महिना ₹४,००० वैद्यकीय खर्चाचा निधी उपलब्ध करणे.

८ वा वेतन आयोग गठीत करण्यासाठी समिती स्थापन करणे.

अंगणवाडी, आशा वर्कर आणि मिड डे वर्कर यांना शासन सेवेत सामावून घेऊन पेन्शन लागू करणे.

अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस श्री. सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केले की, “या उपक्रमांमधून भारतीय मजदूर संघाच्या संघटनात्मक एकतेचे दर्शन घडले.”

या मेळाव्यात बँक, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, वीज, परिवहन, मेट्रो, अंगणवाडी, घरेलू, बांधकाम, महापालिका आणि खासगी हॉस्पिटलमधील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निमित्ताने “मेरा घर BMS घर” अभियानांतर्गत सर्व सभासदांनी आपल्या घरावर संघटनेचा झेंडा लावला.

तसेच भारतीय मजदूर संघा ने असंघटित कामगारांसाठी स्थायी कल्याण मंडळ स्थापन करण्याची मागणी सरकारकडे केली. कंत्राटी कामगारांसाठी कायद्यात बदल, समान काम–समान वेतन, पीएफ आणि सुरक्षा यासाठी तातडीने सुधारणा व्हावी, अशी ठाम भूमिका या मेळाव्यात मांडण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – विवेक ठकार
आभार प्रदर्शन – बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

कामगार मेळाव्यात खाजगी आस्थापनांतील, वीज उद्योगातील कायम व कंत्राटी, बँक, विमा, संरक्षण, शिक्षण, सार्वजनिक क्षेत्र टेलीफोन, मेट्रोतील कामगार, इंडियन ऑईल, घरेलू कामगार, बीडी कामगार तसेच पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ, चाकण, शिरवळ, पिरंगुट, भोसरी, रांजणगाव, मावळ, उर्से, शिक्रापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button