संगमनेर तालुक्यात दुध उपादकांची दिवाळी गोड, राजहंस दूध संघाकडून 41 कोटी रुपये बँकेत वर्ग – रणजितसिंह देशमुख

संगमनेर (प्रतिनिधी)–
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरवलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दुधावर मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाच्या वतीने दीपावली निमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट ,अनामत ,कामगारांचा बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण 41 कोटी रुपये बँकेत वर्ग केले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका दूध संघाची वाटचाल कायम कौतुकास्पद राहिली आहे. दूध व्यवसाय हा तालुक्याची ओळख बनला असून राजहंस दूध संघाने मागील वर्षात 550.70 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या प्रतीच्या दूध पुरवाठ्यावर दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध फरक अदा करण्यात येतो. त्याप्रमाणे यावर्षीही करण्यात आला आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या गुणवत्तेचे कामकाज, शिस्त, काटकसर व पारदर्शक कारभार या आदर्श तत्त्वावर दूध संघाचे कामकाज सुरू असून दूध व्यवसायामुळे तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.
याबरोबर अमृत उद्योग समूहातील सर्व शिखर संस्था, गाव पातळीवरील सहकारी संस्था, तालुक्यातील सहकार, दूध व्यवसाय, शिक्षण ,शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था यामुळे संगमनेर शहराची बाजारपेठ फुलली आहे.
राजहंस दूध संघाकडून दरवर्षीप्रमाणे दीपावली निमित्त दूध उत्पादक व कामगारांना बोनस अदा होत आहे. या सर्व रकमा दिवाळीपूर्वीच बाजारात येत असल्यामुळे व्यापाऱ्यांची ही मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार आहे.
राजहंस दूध संघाचे निर्भीळ, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पौष्टिक दूध, आणि उच्च प्रतीचे उपपदार्थ हे आपल्या दूध उत्पादकांनी पुरवठा केलेल्या दुधापासून तयार केलेले असून राज्यभर या उपपदार्थांना मोठी मागणी आहे. तालुका जिल्हा व परिसरातील सर्व शेतकरी, व्यापारी, दूध उत्पादक ,नोकरदार या सर्वांनी या राजहंस दूध संघाच्या दर्जेदार गुणवत्ता पूर्ण दूध व उत्पादकांचा वापर करावा असे आवाहन ही चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे.
तर तालुक्यातील प्राथमिक सहकारी दूध संस्थांना किफायतशीर दूधभाव मिळणे कामी संगमनेर दूध संघास स्वच्छ व निर्भेळ दुधाचा पुरवठा करावा असे आवाहन व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांनी दूध उत्पादकांना केले आहे.
दीपावली निमित्त राजहंस दूध संघाकडून 41 कोटी रुपये बाजारात आल्याने सर्व दूध उत्पादक, कामगार व संगमनेर शहरातील व्यापारी यांच्यामध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्वांनी राजहंस दूध संघाचे अभिनंदन केले आहे.
दिवाळी गोड होणार
दरवर्षीप्रमाणे दीपावली सणानिमित्त दूध उत्पादक व कामगारांना बोनस रक्कम अदा होत आहे .या सर्व रकमा दीपावली निमित्त बाजारात येत असल्यामुळे शांत असलेल्या शहरातील बाजारपेठेतील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी व कामगारांची दिवाळी गोड होणार असून या निर्णयाचे सर्व दूध उत्पादक, कामगार, शेतकरी व व्यापारी यांनी अभिनंदन केले आहे.