शिवपानंद शेतरस्ते चळवळ देशभर पोहचेल : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
देशाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवार दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी, राळेगण सिद्धी येथे शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या कामाचे कौतुक केले.
शरद पवळे हे माझ्या गावाच्या शेजारील नारायण गव्हाण येथील असून, माझ्याकडे नेहमी येत असतात. हा कार्यकर्ता निस्वार्थी आहे. या चळवळीची सुरवातही त्याने माझ्यापासूनच सुरू केली. त्याच्या स्वतःच्या शेत रस्त्याबद्दल त्याने जे सोसले, त्यातून त्याला प्रेरणा मिळाली आणि शिव, पाणंद शेत रस्ते चळवळ सुरू केली.
चळवळीने राज्यभर व्यापक स्वरूप धारण केल्याचा मला अभिमान वाटतो. आता तर शासनालाही याची दखल घ्यावी लागली. चळवळीतील तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे. कुणालाही न सुचलेला हा विषय तुम्ही घेतला. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होऊ लागलाय. त्यामुळे तुमचे आणि चळवळीचे हे काम देशभर पोचेल याची मला खात्री आहे. आणि त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छाही आहेत. असे गौरवोद्गार अण्णांनी यावेळी काढले.