पद्मशाली समाजातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान करणार..’…..

.
पद्मशाली सखी संघमचा पुढाकार.
सोलापूर – पूर्वी सारखा काळ राहिलेला नाही, आजच्या घडीला विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अथक परिश्रम, चिकाटी, जिद्द याच विचाराने महत्वाकांक्षा बाळगून शिक्षणापासून ते आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आजच्या काळात सर्व जाती – धर्मातील महिला प्रयत्नात आहेत. शिक्षणानंतर नोकरी, व्यवसाय, उद्योग या क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटविण्याची इच्छा बाळगतात. पूर्वी सारखा काळ राहिलेला नाही, काळ बदलत गेला त्याप्रमाणे ‘पद्मशाली’ समाजातील महिलाही बदलत गेल्या आहेत. पूर्वी चार भिंतीच्या आड राहून घर, मुले आणि कुटूंब एवढेच प्रपंच समजून समाधानाने रहायच्या. गेल्या अनेक वर्षांपासून आणि सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, काही महिला संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत तर, काही महिला पतीच्या सहकार्याने उद्योग, व्यवसायात प्रगती करत आहेत. तर काही महिला स्वतःच्या पायांवर उभे राहण्याची इच्छा व्यक्त करताना दिसून येतात. अशा महिलांना आणि इतर महिलांनाही ‘प्रेरणा’ मिळावी या उद्देशाने सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, ‘पद्मशाली सखी संघम’च्या वतीने पद्मशाली समाजातील महिलांना पुरस्कार देउन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक गौरीशंकर कोंडा, पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा, सचिवा कु. रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर यांनी दिली आहे.

पद्मशाली समाजात विवाहित महिला उद्योग व व्यवसाय करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. तर काही महिला घरातून, हातगाडी, शॉप्स आदींच्या सहाय्याने छोट्या उद्योगातून मोठ्या उद्योग, व्यवसायात प्रगती करणाच्या प्रयत्नात आहेत. सोलापूरसह महाराष्ट्र आधी राज्यातील पद्मशाली समाजाच्या महिलांना पुरस्कार देउन गौरविण्यात येईल. येत्या दि. ३१ जानेवारी रोजी पद्मशाली समाजाचे कुलदैवत महर्षी चिरंजीव श्री मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल. पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, सोलापूरी टेरी टॉवेल, पुष्पगुच्छ असे राहील. यासाठी नांवे सूचवण्यासाठी किंवा प्रस्ताव पाठवण्यासाठी पद्मशाली महिलांनी व समाज बांधवांनी आपल्या निदर्शनास आलेल्यांची महिलांचे नावे, माहिती, मोबाईल क्रमांकासह 9021551431या क्रमांकाच्या व्हाटस्ॲपवर किंवा वर्षा रबर स्टॅम्प 1304, भद्रावती पेठ, सोलापूर- 413005 या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन सहसचिव वनिता सुरम – श्रावणी कनकट्टी, खजिनदार गीता भूदत्त, सहखजिनदार हेमा मैलारी, समन्वयिका पल्लवी संगा, ममता तलकोकूल आणि भाग्यलक्ष्मी तुम्मा यांनी केले आहे.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि पद्मशाली समाजातील काही दातृत्वांच्या सहकार्याने पद्मशाली समाजात उल्लेखनीय ठसा उमटविलेल्या महिलांना ‘पद्मकन्या’ तर, बांधवांना ‘पद्मरत्न’ पुरस्कार २०१४ ते २०१८ पर्यंत देण्यात आले होते. मध्यंतरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुरस्कार सोहळा स्थगित केले होते. हा पुरस्कार स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावर देण्यात आला होता. पुरस्कार सोहळा लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तेलुगु सिनेसृष्टीतील काही कलावंत सदरच्या पुरस्कार सोहळ्यास येण्यासाठी इच्छुक आहेत, असे गौरीशंकर कोंडा यांनी सांगितले.



