गिरीश महाजन यांनी नाशिककरांची माफी मागून तातडीने वृक्षतोड रद्द करावी.: आम आदमी पार्टी

नाशिक प्रतिनिधी /डॉ. शाम जाधव
:काल रविवारी, सकाळी ११ वाजता आम आदमी पार्टी राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत ,अँड प्रभाकर वायचळे, नाविंदर अहलुवालिया ,शहर अध्यक्ष अमोल लांडगे ,महिला शहर अध्यक्ष शेतांबरी आहेर ,शहर संगठक अनिल कौशिक ,युवा शहर अध्यक्ष अमर गांगुर्डे ,व उपाध्यक्ष गणेश निर्भवणे , सहसंगठन प्रमुख माजिद पठाण प्रमुख ,योगेश कापसे ,गोरख मोहिते ,कलविंदर गरेवाल , राज कुमावत ,रघुनाथ चौधरी व इतर शहर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तपोवन नाशिक येथील प्रस्तावित खाजगी साधुग्राम आणि वृक्षतोड ठिकाणी भेट दिली.
यावेळी राज्य पदाधिकारी व राज्य प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की ‘गिरीश महाजन व प्रशासनाच्या बोलण्यात सत्याचा अंश किती हा मुख्य प्रश्न आहे. वृक्ष अधिनियम १९७५ कलम ५अ प्रमाणे एकास दहा झाडे असे नसून त्या वृक्षाच्या वय वर्षे इतके वृक्ष लावणे आवश्यक आहे. म्हणजे एखादे झाड ३० वर्षे जुने असेल तर ३० झाडे लावणे , ती सुद्धा किमान ६ फूट उंचीची , १५ दिवसांच्या आत आणि किमान ७ वर्षे त्याची निगा घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गिरीश महाजन जे आश्वासन देत आहेत तेच मुळी कायद्यास धरून नाही.”
दुसरी बाब म्हणजे या बाबतीतील प्रत्यक्ष अनुभव काय आहे? २०१७ मध्ये जो पुणे नाशिक महामार्ग बांधला त्यावेळेस वृक्ष कापले गेले त्याच्या बदल्यात ३९ हजार वृक्ष २०२५ मध्ये सुद्धा लावले गेले नव्हते, त्या बाबतीत राष्ट्रीय हरित लवादाने फेब्रुवारी मध्ये ताशेरे ओढले आहेत. तर पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर १लाख झाले लावण्याचे काम टोल कंत्राटदाराला दिलेले असूनही आज २० वर्षानंतर ४०००० झाडे सुद्धा नाहीत. आणि मध्यंतरी समोर आलेली गंभीर बाब म्हणजे पुण्यात २० महिन्यात २२३६२ झाडे कापली गेली, भरपाई म्हणून ३,४०,००० झाडे वाढवायची होती तर त्याची कोणतीही माहितीच संकलित नाही.हीच स्थिती नाशिक मुंबई पालिकेतही आहे. आणि ५२ कोटी वृक्ष लागवडीचे काय झाले ते फक्त मुनगंटीवार यांनाच माहीत असावे.
हिंदू आणि इतर सर्वच धर्मात नदी, सूर्य याला पूजिले जाते तसेच वड, शमी, पिंपळ आदी वृक्षांची पूजा केली जाते. अगदी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा वृक्षवल्लीचे महत्त्व सांगितले आहे. वृक्ष कापणे हे पाप असे शंकराचार्य सरस्वती यांनी पण म्हंटले आहे.
आता तर प्रशासन निर्लज्ज पणे तिथे २२० कोटींचे एक्झिबिशन सेंटर उभे करू म्हणते आहे. मग ही साधूग्राम म्हणत संतभूमी, तपोवन नष्टच करणार होतात तर मग कुंभमेळा हे फक्त निमित्त आहे का? १२ वर्षांनी साधूंच्या मुक्कामासाठी कोणते ठिकाण असेल? खाजगी साधुग्राम म्हणजे पीपीपी मॉडेल हे भाजप चे धर्मकारण आहे का? असा प्रश्न मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

ही सर्व फसवाफसवी आणि मोठी कंत्राटे यातील हितसंबंध हेच वास्तव असून गिरीश महाजन यांनी नाशिकवासियांची आणि साधूंची पण माफी मागायला हवी. भाजप चे ट्रिपल इंजिन म्हणजे स्थानिक पालिका पातळीवर राज्याचे निर्णय जबरदस्ती लादणे आहे अन्यथा भाजप ने नाशिककरांच्या भावनांचा आदर करावा असे आवाहन आम आदमी पार्टी ने केले आहे.


