अभिनेत्री अश्विनी भाऊसाहेब इरोळे यांच्या पुढाकारातून शिवविचारांची जनजागृती

दत्ता ठुबे दि.१७ पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि स्वराज्य निर्मितीचा आदर्श केवळ इतिहासाच्या पानांत मर्यादित न राहता तो घराघरांत आणि मनामनात पोहोचावा, या उदात्त हेतूने एक नवी सांस्कृतिक क्रांती आकाराला येत आहे. आशिया खंडात प्रथमच सार्वजनिक स्वरूपात सलग पाच दिवस चालणाऱ्या ‘शिवचरित्र पारायण’ या ऐतिहासिक उपक्रमाची मुहूर्तमेढ अभिनेत्री अश्विनी भाऊसाहेब इरोळे यांनी रोवली असून, या उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होत आहे.
भारतीय संस्कृतीत धार्मिक ग्रंथांच्या पारायणाची मोठी परंपरा आहे. मात्र, राष्ट्रनिर्मितीचे मूल्य रुजवणारे छत्रपती शिवरायांचे चरित्रही तितक्याच भक्तीने आणि शिस्तीने सार्वजनिकरीत्या वाचले जावे, ही संकल्पना अश्विनी इरोळे यांनी मांडली. २०२१ मध्ये पारनेर तालुक्यातील संत निळोबारायांच्या पिंपळनेर या पावन भूमीतून या उपक्रमाची सुरुवात झाली. अभिनय क्षेत्रातील व्यस्ततेतून वेळ काढून, स्वतः संपूर्ण शिवचरित्राचे वाचन व पठण करून त्यांनी समाजमनासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
यावर्षीचा हा प्रेरणादायी सोहळा पिंपळगाव कौडा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथे संत रघुनाथ बाबा यांच्या सानिध्यात पार पडणार आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित या सोहळ्याचे स्वरूप अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय असते. गेल्या चार वर्षांपासून या उपक्रमाला देश-विदेशातील शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.या पाच दिवसीय महोत्सवात केवळ वाचनच नव्हे, तर विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते सलग चार दिवस ‘श्रीमान योगी’ या ग्रंथाचे सार्वजनिक पारायण. दररोज त्रिकाल संध्या आणि मान्यवरांच्या हस्ते महाआरती पार पडते .तरुण पिढीमध्ये संस्कार रुजवण्यासाठी दररोज सायंकाळी बाल कीर्तनकारांची कीर्तन सेवा आयोजित केली जाते. पाचव्या दिवशी शिवविचारांच्या प्रसारासाठी विशेष ‘होम-हवन’ केले जाते. तसेच शिवरायांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक, महापूजा आणि भव्य शिवव्याख्यान होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होते “छत्रपती शिवरायांचे विचार हीच खरी शक्ती आहे. हे विचार पारायणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे, हे आमचे भाग्य आहे.” अभिनेत्री अश्विनी भाऊसाहेब इरोळे
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे, रामदास दळवी, किरण लोंढे, सुरेखा पोटघन यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. आशिया खंडातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याने शिवप्रेमींमध्ये मोठे कुतूहल आणि आदराची भावना आहे.



