मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत भांडगाव शाळेची तालुकास्तरीय समितीकडून पाहणी

‘
पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत तालुकास्तरीय तपासणी समितीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भांडगाव येथे भेट देऊन शालेय उपक्रमांची सविस्तर पाहणी केली.
यावेळी समितीने शाळेतील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि विशेषतः लोकसहभागातून राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तालुकास्तरीय समितीमध्ये विस्तार अधिकारी देवराम पिंपरकर , केंद्रप्रमुख बाचकर आणि मोकळे सर यांचा समावेश होता. समितीने शासनाच्या तपासणी सूचीनुसार शाळेतील प्रत्येक घटकाची सूक्ष्म पाहणी केली. यामध्ये प्रामुख्याने शालेय परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण, मैदानाची निगा आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला.
‘मिशन आपुलकी’ आणि लोकसहभागावर विशेष भर
तपासणी दरम्यान समितीने शाळेतील ‘परसबाग’ उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या आहारात ताज्या भाज्यांचा समावेश व्हावा, या दृष्टीने विकसित केलेली परसबाग आदर्श असल्याचे समितीने नमूद केले. तसेच, ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत शाळेने समाजातील दानशूर व्यक्तींकडून जो लोकसहभाग मिळविला आहे, त्याबद्दल विस्तार अधिकारी पिंपरकर साहेब यांनी समाधान व्यक्त केले. शाळेचे अद्ययावत रेकॉर्ड आणि पारदर्शक कामकाजाची पद्धत पाहून समितीने शाळेच्या प्रशासकीय शिस्तीवर शिक्कामोर्तब केले.
यावेळी समिती प्रमुख देवराम पिंपरकर, बाचकर साहेब आणि मोकळे सर यांचा शाल आणि ‘नाना, मी साहेब झालो!’ हे प्रेरणादायी पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना वाचनाची ओढ वाढावी आणि विद्यार्थ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पुस्तकाची भेट देऊन करण्यात आलेला हा सत्कार चर्चेचा विषय ठरला.शाळेचे मुख्याध्यापक अप्पासाहेब नरवडे आणि. बाळासाहेब सालके यांनी समितीला शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. यावेळी समितीने विचारलेल्या सर्व तांत्रिक आणि शैक्षणिक प्रश्नांना मुख्याध्यापकांनी समर्पक उत्तरे दिली.
“यावर्षी आम्ही अभियानात उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. समितीने दिलेल्या सूचना आमच्यासाठी मार्गदर्शक आहेत. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात आम्ही अधिक पूर्वतयारीसह आणि नवनवीन उपक्रमांसह या स्पर्धेत उतरू आणि शाळेचा दर्जा आणखी उंचावू.”
अप्पासाहेब नरवडे
मुख्याध्यापक, भांडगांव शाळा.



