वीज कंत्राटी कामगार संघाचे सोलापूर जिल्हा अधिवेशन पंढरपूर ला उत्साहात संपन्न;

११ मार्च रोजी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन.
पंढरपूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न – भारतीय मजदूर संघ) सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी पंढरपूर येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या अधिवेशनात कंत्राटी कामगारांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून, प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ११ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात श्रमिक गीत आणि प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी ‘भारतीय मजदूर संघ जिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाची प्रस्तावना व मान्यवरांचा परिचय श्री. रवींद्र कांबळे यांनी करून दिला. या प्रसंगी पंढरपूरचे कार्यकारी अभियंता, मा. श्री. संजय शिंदे आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अनंत मोडक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अखिल भारतीय मजदूर ठेका संघाचे सरचिटणीस मा. श्री. सचिन मेंगाळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कंत्राटी वीज कामगारांना नोकरीत स्थैर्य मिळणे, कंत्राटदारविरहित रोजगार उपलब्ध होणे आणि ‘समान काम-समान वेतन’ लागू होणे या मागण्यांसाठी संघ आग्रही आहे.” तसेच, कार्याध्यक्ष मा. श्री. अमर लोहार आणि कामगार नेते मा. श्री. मयूर गवते यांनी या मागण्यांसाठी कायदेशीर लढ्यासोबतच गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
- मुंबईत भव्य मोर्चाचे आवाहन :–
- भारतीय मजदूर संघ सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मा. श्री. नंदकुमार भोसले यांनी आपल्या भाषणात कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि नवीन कामगार कायद्यातील सुधारणांबाबत लक्ष वेधले. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ११ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित भव्य मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
नूतन कार्यकारिणीची निवड :–
या अधिवेशनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सोलापूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी श्री. अनंत मोडक तर सचिवपदी श्री. अतुल कदम यांची निवड करण्यात आली.
अधिवेशनातील ठराव :–
अधिवेशनात कंत्राटदार विरहित रोजगार व समान कार्य-समान वेतनाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
या अधिवेशनास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न – भारतीय मजदूर संघ) सोलापूरचे उपाध्यक्ष श्री. राजकुमार काळे, बारामती झोनचे अध्यक्ष श्री. रवींद्र कांबळे, संघटन मंत्री श्री. गुरुदेव माने आणि सुमारे ३०० हून अधिक कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. शशिकांत सोंडकर यांनी केले.



