पर्यावरणाचा संदेश देत हळदी-कुंकू कार्यक्रमात अकोल्यात महिलांना देशी ‘कुंदा’ रोपांची भेट

एस के जाधव
महादर्पण प्रतिनिधी
सण, संस्कृती आणि सामाजिक भान यांची सुंदर सांगड घालत पर्यावरण संवर्धनाचा जिव्हाळ्याचा संदेश देणारा एक स्तुत्य उपक्रम अकोल्यात वरद विनायक रो हाऊसिंग सोसायटी येथे उत्साहात पार पडला.
सोसायटीतील महिलांनी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात पारंपरिक भेटवस्तूंऐवजी महिलांना स्थानिक देशी प्रजातीतील, मन प्रसन्न करणाऱ्या पांढऱ्या फुलांच्या कुंदा झाडांची रोपे भेट देण्यात आली. त्यामुळे सणाचा आनंद आणि निसर्गप्रेम यांचा दुहेरी संगम अनुभवायला मिळाला.
या अभिनव उपक्रमामागे माधवी योगेश नवले, गीता संजय दिघे आणि रंजना विनोद खतेले यांची पर्यावरणपूरक संकल्पना होती. हळदी-कुंकवाच्या मंगल वातावरणातून देशी प्रजातींचे संवर्धन व्हावे, कृत्रिम वस्तूंपेक्षा निसर्गदायी पर्याय स्वीकारण्याची सवय वाढावी आणि पांढऱ्या फुलांमधून शांती, पवित्रता व त्याग यांसारख्या सकारात्मक मूल्यांचा संदेश समाजात पोहोचावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात उपस्थित महिलांनी या कल्पक उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. वाढते शहरीकरण, कमी होत चाललेली देशी झाडे आणि बदलती जीवनशैली यांचा विचार करता, सणासुदीच्या माध्यमातून पर्यावरणाचा विचार मांडण्याची ही पद्धत काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. परंपरेला आधुनिक सामाजिक जाणिवेची जोड देणारा हा प्रयत्न इतर संस्थांसाठीही आदर्श ठरू शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास सोसायटीतील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. शेवटी सर्वांना तिळगुळ देत “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असा स्नेह आणि सौहार्दाचा संदेश देऊन कार्यक्रम मंगल वातावरणात संपन्न झाला.
———-
*“महिलांमधूनच देशी वृक्ष संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकते” — माधवी योगेश नवले
प्रत्येक दारासमोर मन प्रसन्न करणाऱ्या स्थानिक देशी प्रजातीच्या फुलझाडांचे रोप लावले गेले, तर परिसराचा चेहरामोहराच बदलेल, या विचारातून हा छोटासा प्रयत्न करण्यात आल्याचे माधवी योगेश नवले यांनी सांगितले. महिलाच घर, अंगण आणि परिसराच्या पर्यावरणाशी रोजच्या आयुष्यात प्रत्यक्ष जोडलेल्या असल्याने, त्यांच्या सहभागातून देशी प्रजातींच्या वृक्ष संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या सहकार्याने भविष्यात परिसरात देशी वनस्पती संवर्धनासाठी व्यापक आणि सातत्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
———–==-=—–


