पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील कामगारांचे २६ जानेवारीपासून ‘रास्ता रोको’ व बेमुदत उपोषणाचा इशारा

पुणे प्रतिनिधी
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील कामगारांनी आपल्या मागण्यासाठी २६ जानेवारीपासून ‘रास्ता रोको’ व बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे
पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेचे काम आय आर बी व आर्यन पंप यांच्या व्दारे करणाऱ्या शेकडो कामगारांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप बाळासाहेब भुजबळ संघटन सचिव भारतीय मजदूर संघ यांनी केला आहे.
प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, या अन्यायाविरोधात दिनांक २६ जानेवारी २०२६ पासून पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील संबंधित कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’ आणि बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
प्रमुख मागण्या आणि समस्या:
१. वेतनवाढ: सन २०२४–२५ या कालावधीतील कायदेशीर वेतनवाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही.
२. ओव्हरटाईम: नियमांनुसार मोबदला न देता केवळ नाममात्र रक्कम देऊन कामगारांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.
३. वैद्यकीय सुरक्षा: अपघातग्रस्त कामाचे स्वरूप पाहता सध्याची मेडिक्लेम योजना अपुरी आहे. प्रत्येक कामगाराला किमान ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळावे.
४. सुरक्षा साधने: हेल्मेट, सेफ्टी शूज, जॅकेट, रेनकोट आणि संपूर्ण PPE किट तात्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
वारंवार बैठका घेऊन आणि लेखी निवेदने देऊनही कंपनी व प्रशासनाने या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. “या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीस आणि सार्वजनिक गैरसोयीस सर्वस्व प्रशासन व संबंधित कंपनी जबाबदार राहील,” असा स्पष्ट इशारा भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी दिला आहे.
या आंदोलनात त्यांचे कुटुंबीय आई वडील, पत्नी मुले , स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, सदरील रस्ता रोको आंदोलन हे कूसगाव ऑफीस जवळ पास हायवेवर होणार असून मागणीपत्र मान्य होईपर्यंत लढा मागे घेतला जाणार नाही, असा निर्धार सचिन मेंगाळे (पुणे जिल्हा मजदूर संघ) यांनी व्यक्त केला आहे. तसेच अर्जुन चव्हाण, सागर पवार, उमेश विश्वाद, बाळासाहेब पाटील, व भारतीय मज़दूर संघ पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहेत



