नाशिक पुणे रेल्वेबाबत खासदार वाकचौरे यांनी लोकसभेत उपस्थित केला तारांकित प्रश्न!

अकोले प्रतिनिधी
: महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण ५८ हजार ९४२ कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. अनेक महत्त्वाच्या मार्गांचे काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे बेलापूर (श्रीरामपूर) आणि परळी स्थानक हे अंकीया, जालना,तसेच परभणी मार्गाशी जोडलेले आहेत. याशिवाय, बीड मार्गे बेलापूर (श्रीरामपूर) आणि परळी वैजनाथ यांच्यात अतिरिक्त संपर्क प्रस्थापित करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने अनेक प्रकल्पांची माहिती दिली असली, तरी नाशिक- पुणे रेल्वे (व्हाया संगमनेर) आणि ब्रिटिशकालीन बेलापूर (श्रीरामपूर) व्हाया नेवासा, शेवगाव, गेवराई ते परळी या मार्गाला अद्याप मंजुरी दिलेली नाही. यावरून खासदार वाकचौरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गांना तातडीने मंजुरी देण्याची आग्रही मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी येत असल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. यात प्रामुख्याने भू-संपादन आणि वन विभागाच्या परवानग्या, विभिन्न प्राधिकरणांची मंजुरी आणि कायदा व सुव्यवस्था, भौगोलिक परिस्थिती आणि मनुष्यबळा ची उपलब्धता ही कारणे आहेत. या प्रकल्पांचा नियमित आढावा घेऊन पारदर्शक निधी वितरण आणि प्रगती अहवाल जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी खासदार वाकचौरे यांनी यावेळी केली.
———



