इतर

शिर्डी तील साईबाबांकडे मागितला एक दिवा, बाबांनी दिले दोन दिवे!

शिर्डी दि 11 – देश-विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा शिर्डी तील साईबाबांवर वर आहे म्हणूनच देशभरातून लाखो भाविक साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतात ठाण्यातील एका साई भक्ताने आपल्या वंशाला एक दिवा द्या असा नवस साईबाबांकडे केला होता या नवसाला साईबाबा पावले असून साईबाबांनी या साई भक्ताच्या वंशाला एक नव्हे तर एकाच वेळी दोन दिवे दिले आहे!

ठाणे येथील नार्वेकर कुटुंबीयांनी साईबाबांकडं पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता. साईबाबांच्या कृपेनं त्यांचा नवस पूर्ण झाला अशी त्यांची भावना आहे. त्या भावनेतून त्यांनी साईबाबांच्या चरणी आज 11 लाख रुपयांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण केले

ठाणे येथील साईभक्त संतोष नार्वेकर यांनी दोन वर्षांपूर्वी शिर्डी साईबाबांच्या चरणी पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता. वंशाला दिवा मिळावा अशी प्रार्थना त्यांनी साईबाबांकडं केली होती. साईबाबांनी त्यांच्या वंशाला एक नव्हे तर दोन दिवे दिले .साईबाबांच्या आशीर्वादाने त्यांच्या कुटुंबात एक मुलगी आणि एक मुलगा असा दुहेरी आनंद मिळाला, अशी त्यांची भावना आहे. साईबाबांना केलेला नवस फेडण्यासाठी नार्वेकर कुटुंबीय आपल्या वरद आणि रुंदा या मुलांना घेऊन आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला उपस्थिती लावत साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. संपूर्ण कुटुंबानं साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत बाबांचे आशीर्वाद घेतले.

साईचरणी सोन्याचे दिवे
देऊन केली नवस पूर्ती:

“वंशाला एक दिवा मिळावा असा नवस मी साईबाबांच्या चरणी केला होता. मात्र बाबांनी आम्हाला एक नव्हे तर एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलं देऊन आमचं कुटुंब पूर्ण केलं. त्यामुळं साईबाबांच्या चरणी कृतज्ञतेपोटी आज दोन सोन्याचे दिवे अर्पण केले आहेत. या दोन सोन्याच्या दिव्यांचे एकूण वजन सुमारे सात तोळे असून त्यांची अंदाजे किंमत सुमारे 11 लाख रुपये आहे,” असं साईभक्त संतोष नार्वेकर यांनी सांगितलं. साईबाबांच्या कृपेनं आपला नवस पूर्ण झाला असून ही बाबांवरील श्रद्धा, विश्वास आणि कृतज्ञतेचे प्रतीक असल्याची भावना नार्वेकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नार्वेकर कुटुंबीयांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी नार्वेकर साईभक्त परिवाराने संस्थानला देणगी स्वरूपात देण्यासाठी आणलेले दोन्ही सोन्याचे दिवे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button