वाकी ता अकोले येथे कळसूबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्याचा ४० वा वर्धापन दिन साजरा

एस के जाधव /महादर्पण प्रतिनिधी
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार २५ फेब्रुवारी १९८६ रोजी कळसूबाई -हरिश्चंद्रगड अभयारण्य अधिघोषीत करण्यात आले . उत्तर पश्चिम घाटात अंदाजे ३६२ किमी क्षेत्रफळात विस्तारलेल्या अहिल्यानगर -नाशिक -ठाणे – पुणे या जिल्हयांच्या सरहद्दीवरील अकोले तालुक्यातील हे वैशिष्टयपूर्ण अभयारण्य आहे . या अभयारण्याचा ४० वा वर्धापन दिन वन्यजीव संरक्षण विभाग नाशिक व आऊल कॉन्झर्वेशन फाउंडेशन यांच्या पुढाकाराने जि.प. प्राथ . शाळा वाकी ता. अकोले येथे उत्साहात पार पडला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे श्री . शशिकांत जाधव यांनी भुषविले . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वनपाल मा . शंकर लांडे उपस्थित होते . तर प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ जैवविविधता तज्ज्ञ मा .रमाकांत डेरे उपस्थित होते .
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व आदयक्रांतिकारक सह्याद्रीचा रक्षक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुजण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . आढळा – प्रवरा -मुळा नदयांच्या खोऱ्यानी व्यापलेला व भंडारदरा धरणाच्या थंडगार निसर्गरम्य सानिध्यात , कळसूबाई शिखराचा उत्तुंग वारा अंगावर खेळवणारा आणि अलंग , मदन ,बितनगड , पट्टाकिल्ला ,पाभरगड, शिरपूंजा गड, कोंबडकिल्ला यांना वेगाने स्पर्श करणारा पाऊस झेलणारा हा परिसर . कुडल , सिरस , पांगारा ,कराप, अशिंद, धामण ,सादडा, अर्जुन , बेहडा , जांभूळ , चांदवा , बहावा , कुंभळ,खारवेल, गुलचावी , आवळी अशा दुर्मिळ व औषधी वनस्पतींचे वरदान लाभलेले , मुंगूस , सांबर , ससा , वानर , कोल्हे, रानमांजर , रानडुक्कर , तरस,माकड, खोकड, खार , ससाण ,भेकर,सायाळ , उदमांजर, बिबट ,निलगाय, राज्यप्राणी -शेखरू यांचे वास्तव्य आणि विविध दुर्मिळ पक्षी , किटक यांचे नैसर्गिक अस्तित्व असलेले हे अभयारण्य .

आजचे विदयार्थी हे भारत मातेचे भावी जबाबदार नागरिक असून , तुम्ही वन्यजीव संपदा संरक्षणासाठी सज्ज व्हायला हवे . निसर्गाने मोकळ्या हाताने बहाल केलेली संपदा , अन्नसाखळी आणि परागीभवन या प्रक्रिया टिकल्या तरच मानव जात भविष्यात टिकेल असे ज्ञानामृत वनपाल मा . शंकर लांडे यांनी विद्यार्थ्यांना दिले . खऱ्या अर्थाने वनपाल लांडे यांनी गुरुजी होऊन मुलांना वन्यजीवांची ओळख करून देताने , त्यांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले . वनपाल मा . शंकर लांडे यांनी मुलांना अभयारण्यातील वेगवेगळ्या जंगली पशु – पक्ष्यांची , वनस्पती व किटकांची आणि त्यांच्या अधिवासाची ओळख करून दिली .बिबट्यापासून संरक्षण कसे करावे याबाबत उपयुक्त माहिती देताना संकटग्रस्त जीवसृष्टीबद्दल चिंता व्यक्त केली . त्यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले .मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनाला चर्चात्मक प्रतिसाद देत आयुष्यातील भूत दया या संस्काराचे धडे घेतले. तसेच त्यांची वन्यजीव सृष्टीविषयी माहिती ऐकूण खऱ्याअर्थाने आपल्याला नवे ज्ञान व योग्य दिशा मिळाल्याचे समाधान त्यांच्यात दिसले . त्यांच्यातला वनपाल रूपी अनुभवी शिक्षक मुलांना दिसला . त्याच्या मार्गदर्शनातून मिळालेली वन्यजीवविषयी अनमोल संपदा विदयार्थी दीर्घकाळ स्मरणात ठेवून तिच्या संरक्षणासाठी आपोआप दक्ष होतील , यात शंका नाही .
आपण प्राणी पाळतो , का पाळतो ? आपण प्राणी पाळतो म्हणजे त्यांना अभय देतो . सांभाळायचं आहे , ते अभय आहे . अभयारण्य टिकलं पाहिजे , जगवलं पाहिजे . आपल्याला जगण्यासाठी हे किती महत्त्वाचे आहे . मंदिरं , नदया , चांगल्या -चांगल्या गोष्टी मानवाच्या कल्याणासाठी आहेत , असं हे अभयारण्य आहे . त्यासाठी तीन गोष्टी कराव्यात . पहिली गोष्ट -तोडायचं नाही म्हणजे झाडं लावली तीवाढवली पाहिजेत . दुसरी गोष्ट – काहीपण मारायचं नाही आणि तिसरी गोष्ट -जाळायची नाही कारण जाळल्याणे प्रत्येक गोष्ट नष्ट होते . असे अनमोल वन्यजीवांविषयी ज्ञान मा .रमाकांत डेरे यांनी मुलांना दिले . .आपला छंद जोपासताना सर्वांसाठी आपला आदर्श निर्माण होईल असे जीवन जगावे असेच त्यांचे या उपस्थित मान्यवरांचे व्यक्तिमत्व .

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक श्री. अनिल पवार सर तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी भंडारदरा श्री. रुपेश गावित व वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती सी.एस. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने वन्यजीव प्रेमी व पक्षी निरीक्षक मा .रोहिदास डगळे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि शिक्षणक्षेत्राविषयी असलेल्या आवडीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी वनरक्षक प्रविण साळुंखे , वनरक्षक अरुण कोरडे , वनकर्मचारी वसंत भागडे , माजी अध्यक्ष दत्तू सगभोर , ग्रामपंचायत सदस्य राम सगभोर , शा .व्य . समिती सदस्य आत्माराम सगभोर , वंदना सगभोर ,प्राजक्ता विदयालयाच्या माधुरी बोरसे , श्री .वाळीबा सदगीर सर , महेश रेवगडे ,वाकी शाळेच्या उपाध्यापिका यशोदा ढगे उपस्थित होते . शाळेचे मुख्याध्यापक श्री .भिमा कोकतरे यांनी सर्वांचे स्वागत केले . शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री . अर्जुन तळपाडे यांनी सुत्रसंचालन केले .वन्यजीव विभाग व आऊल कॉन्झर्वेशन फाउंडेशन कडून या निमित्त मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले . माणसांप्रमाणे अभयारण्याचाही वाढदिवस असतो , हे ऐकूण मूले आवाक झाली . मात्र पुढील कार्यक्रमाची दिशा पाहूण आपणही झाडे , पक्षी , प्राणी यांचा आपल्या प्रमाणे सांभाळ करावा आणि त्यांना अभय दयावे असा निश्चय मताशी नक्की केला . शालेय व्यवस्थापन कमिटी शिक्षणतज्ज्ञ श्री . धिरेंद्र सगभोर यांनी सर्वांचे आभार मानले . सदर नाविण्यपूर्ण उपक्रमाचे मान्हेरे केंद्रप्रमुख मा .सुनिल घुले यांनी कौतुक करत अभिनंदन केले .



