देशी बियाण्यांच्या चळवळीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना एस टी चा मोफत प्रवास!

अकोले प्रतिनिधी
देशी बियाण्यांच्या चळवळीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या अकोले तालुक्याचे भूषण पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना नुकतेच अकोले आगार यांच्याकडून एस टी पास चे वितरण करण्यात आले.
आगार प्रमुख सुरेश दराडे यांच्या हस्ते या पासचे वितरण करण्यात आले. राज्यातील अति महत्त्वाच्या व्यक्तींना राज्य परिवहन मंडळाकडून अशा सवलती दिल्या जातात. या सवलतीचा लाभ आपल्या बीजमातेलाही व्हावा ही इच्छा येतील एसटी कर्मचाऱ्यांची होती. तिला मूर्त स्वरूप आगर व्यवस्थापक सुरेश दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले आहे.

नुकत्याच छोटेखानी कार्यक्रमात या पासचे वितरण अकोले एसटी डेपो मध्ये करण्यात आले. या पासचा उपयोग करून राज्य अंतर्गत विविध ठिकाणी कार्यक्रमांसाठी राहीबाई यांना त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्तीला विना मोबदला प्रवास करता येणार आहे.
या सुविधेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेऊन आदिवासी विकास विभाग यांच्याकडून त्यांना विशेष प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर फ्री पासची व्यवस्था करून देण्यात आल्याचे आगारप्रमुख सुरेश दराडे यांनी जाहीर केले.
याप्रसंगी बोलताना आगार प्रमुख सुरेश दराडे यांनी राहीबाई यांच्या रूपात मी माझी आईच बघतो असे गौरव उद्गार काढले. त्याचबरोबर काष्टी साडी नेसणारी ही शेवटची पिढी आहे यानंतर काष्टी साडीवर महिला दिसणार नाहीत अशी ही खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोले आगाराचे वरिष्ठ लिपिक सचिन वाकचौरे यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुद्धा त्यांनीच केले. यावेळी अकोले आगारातील श्री भापकर सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, ,योगेश वाघमोडे आगार लेखाकार ,अनिता दराडे लिपिक, निशा गोंदके लिपिक,योगिता राक्षे वरिष्ठ लिपिक,सचिन वाकचौरे वरिष्ठ लिपिक, आदर्श वाहक कविता नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
===========



