जागतिक महिला दिनी श्रीरामपूरला ५० आदर्श महिलांचा सन्मान

रिमाताई गोसावी यांचे महिला सबलीकरणाचे कार्य प्रेरणादायी: – प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे
संजय उकिरडे
श्रीरामपूर- स्त्रीपुरुष समानता, आर्थिक समता, सुरक्षित वातावरण,स्वातंत्र्य आणि कौटुंबिक स्वास्थ ही पंचसूत्रे लाभली तर स्त्री सुखी होईल,असे कार्य करणाऱ्या योगागुरु रिमाताई गोसावी यांना स्त्री नारीशक्ती पुरस्कार लाभला, हे अधिक प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन बेलापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफाताई कोकाटे यांनी केले.
श्रीरामपूर येथील आगाशे सभागृहात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त योगा गुरु रिमाताई रमेश गोसावी यांना स्व. सौ. पुष्पा सुखदेव सुकळे स्मृती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय स्री नारी शक्ती पुरस्कार व ५०आदर्श महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,
त्याप्रसंगी प्राचार्य डॉ. गुंफाताई कोकाटे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनानंतर प्रतिष्ठान संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रतिष्ठान उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. शरद दुधाट यांनी केले.
यावेळी बारागाव नांदूर येथील कवयित्री चंद्रकला आरगडे, प्राचार्य सौ. सुमतीताई रावसाहेब औताडे, सौ. गीतांजली किशोर गाढे,डॉ. संजय दुशिंग, दत्तात्रय रायपल्ली यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, पीएसआय गीताराम गायकवाड, माजी नायब तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली, सौ. अनिता बाबुराव शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वांचा सन्मान करण्यात आला.प्राचार्य डॉ. गुंफाताई कोकाटे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि आजच्या महिलांचे जीवन व कर्तव्य याविषयी विस्तृत विवेचन केले.
पुरस्कारार्थी योगागुरू रिमाताई गोसावी यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून आजच्या महिलांनी आरोग्य आणि सांस्कृतिक जीवन गौरवित करावे असे आवाहन करतानाच आपले जीवन अनुभव सांगितले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य टी.ई. शेळके यांनी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान पदाधिकारी, रिमाताई गोसावी यांचे योगदान स्पष्ट करून महिला सबलीकरणाचे महत्त्व विषद केले. बाळासाहेब बुरकुले, संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले,संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले,वैष्णवी बुरकुले,शीतल बुरकुले आदिंनी नियोजनात भाग घेतला.सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट यांनी केले तर डॉ. शिवाजी काळे यांनी आभार मानले.



