धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य व विचार प्रेरणा देणारे : वैभवराव पिचड

अकोले /प्रतिनिधी
धर्मवीर आनंद दिघे यांचे समाजकार्य राज्याला नव्हे तर देशाला प्रेरित करणारे आहे म्हणूनच आजही २१ वर्षानंतरही त्यांचे कार्य व विचार जिवंत आहेत असे प्रतिपादन अकोल्याचे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या २१ व्या पुण्यतिथी निमित्त आंतरभारती ट्रस्ट, धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश स्कूल,मातोश्री राधा फार्मसी कॉलेज,मातोश्री सुलोचना होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदगड, वीरगाव येथे आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते.त्यांच्या हस्ते दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.अध्यक्ष स्थानी अकोले उपविभागीय वन अधिकारी प्रदिप कदम हे होते.
व्यासपीठावर ‘ आंतरभारती ‘ चे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे सचिव अनिल रहाणे , ह भ प दीपक महाराज देशमुख, मा पं. स सदस्य अरुण शेळके,नगरसेवक विजय पवार , शंभू नेहे ,वनाधिकारी श्री कुक्कडवार ,प्रवीणशेठ धुमाळ,श्रीकांत सहाणे, सुनिल वाकचौरे, सुप्रिया वाकचौरे, प्राचार्या पल्लवी फलके,प्राचार्य किरण चौधरी,शिवराज वाकचौरे, आदि होते. श्री पिचड पुढे म्हणाले की स्व.दिघे हे राजकारणी नसून समाजकारणी होते त्यांचे कार्य हे ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हते तर महाराष्ट्रातील कुणाही अडल्या नसल्याचे ते तारणहार होते.ठाण्याचे दैवत तर महाराष्ट्रातील जनतेचे प्रेरणास्रोत होते. आजही त्यांचे विचार व कार्य जिवंत असून वीरगाव सारख्या ग्रामीण भागात आदर्श असे इंग्रजी माध्यमाचे संकुल त्यांच्या नावाने उभे आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेवून रावसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या निधनानंतर लगेच त्यांचे नामकरण शाळेस करून खरी आदरांजली दिघे साहेब यांना दिली होती.आजही राज्यात दिघे साहेब यांच्या विचाराचे सरकार असून त्यांचे विचार अजरामर असणार आहेत. मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांचे या शैक्षणिक संकुलावर विशेष प्रेम असून ते दिघे साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी संकुलास सहकार्य करतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. वनाधिकारी प्रदिप कदम यांनी आपण दिघे साहेब यांच्या नावाने सुरू असलेल्या शैक्षणिक कार्याने भारावून गेल्याचे सांगितले. ह भ प दीपक महाराज देशमुख यांनी दिघे साहेब यांचे समाजकार्य आनंदगड शैक्षणिक संकुलात सुरू असून अनेक प्रज्ञावंत येथे तयार होत आहेत. गोरगरीब ,आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळत आहे हीच खरी दिघे साहेबांना श्रद्धांजली असल्याचे सांगितले. प्रा.संदीप थोरात,निलेश भागडे व विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले
प्रास्तविक प्राचार्य किरण चौधरी यांनी सूत्रसंचालन शिल्पा देशमुख यांनी तर आभार भिमराज मंडलिक यांनी मानले.
——//—–