समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं निधन

मुंबई दि १०
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते.दीर्घ आजारामुळे गुरुग्रामच्या रुग्णालयात त्यांचं निधन झालं. 2 ऑक्टोबरपासून ते मेंदाता या रुग्णालयात दाखल होते.
अखिलेश यादव यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे.“माझे वडील आणि सर्वांचे नेताजी आता राहिले नाहीत,” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. मुलायम सिंह यादव यांच्याबाबत त्यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, “मुलायम सिंह यादव हे उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व होतं. ते विनम्र आणि जमिनीवरील नेते म्हणून ओळखले जायचे. लोकांच्या समस्यांबाबत ते संवेदनशील होते. त्यांनी कायम तत्परतेने लोकांची सेवा केली. लोकनायक जेपी आणि डॉ.लोहीया यांचे आदर्श लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं.”
मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 साली उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात झाला.
मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसंच ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री सुद्धा होते.