इतरक्राईम

कान्हूर पठार येथे पतसंस्थेच्या त्रासामुळे आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तिघांवर गुन्हा दाखल

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :


पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील भागचंद धोंडीभाऊ व्यवहारे यांनी पतसंस्थेच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली. संबंधित पतसंस्थेकडून वारंवार त्रास दिला जात होता. याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यातील अभिनव पतसंस्थेकडून सन २००७ मध्ये याच पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत असताना व्यवहारे यांनी कर्ज घेतले होते. त्यांची शेती कर्जाला तारण होती. या कर्जाच्या अनुषंगाने दि. ४ रोजी संध्याकाळी ७ वाजता सखाराम ठुबे यांच्या घरी ठुबे मळा कान्हूर पठार येथे अभिनव पतसंस्थामार्फत कैलास लोंढे, सुरेश घुमटकर, तसेच बंधू गणेश व महेश असे उपस्थित होते. मध्यस्थी कामी सखाराम ठुबे होते. त्यावेळी कैलास लोंढे यांनी आमच्याकडे नमूद कर्ज व इतर फायलींच्या अनुषंगाने २५ लाख रुपयांची मागणी केली होती.

दि. ५ रोजी सकाळी ६ वाजता बबन संजय व्यवहारे (रा. कान्हूर पठार ता. पारनेर) यांनी फोन करून नारायण टेकडी येथे तुझे वडील भालचंद्र व्यवहारे यांनी फाशी घेतली असल्याचे व्यवहारे यांचा मुलगा सतीश यास सांगितले. पोलिसांनी पंचनामा केला. मृत्यूपूर्वी भालचंद्र व्यवहारे यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यात २००७ साली दीड लाख रुपये कर्ज घेतल्याचे नमूद करीत मी व माझ्या कुटुंबाला कैलास लोंढे, पत्नी कल्पना, त्यांचा भाऊ सुभाष लोंढे यांनी त्रास देऊन वेळोवेळी धमकी देऊन बोगस फाईल दाखवून त्रास देत आहेत. त्यामुळे मागेसुद्धा विष घेण्याचा प्रयत्न केला होता. आता मुलांच्या नावे खातेवाटप केल्यानंतर कैलास लोंढे, सुभाष लोंढे यांनी मला धमकी दिली. त्यामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कैलास लोंढे, सुभाष लोंढे यांचे कुटुंब जबाबदार आहे, असे चिठ्ठीत नमूद आहे.

त्यावरून कैलास अप्पाजी लोंढे, कल्पना कैलास लोंढे, सुभाष आप्पाजी लोंढे (सर्व रा. कान्हूर पठार) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सतीश भागचंद व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button