माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात साजरा

नाशिक,दि.१५ :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांचे ७५ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले. या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांची सुरवात करण्यात आली.

अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने विविध स्पर्धा व उपक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने आज विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेची सुरवात करण्यात आली. तसेच वर्षभर विविध शालेय व मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त छगन भुजबळ यांना सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्य व कला यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याप्रसंगी अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी उपस्थिती लावत छगन भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या. आणि त्यांनी आदिवसी नृत्य सादर करित उपस्थितांची मने जिंकली. यावेळी छगन भुजबळ यांनी आदिवासी बांधवांचे आभार मानले.
अंध बांधवाना विविध वस्तूंचे वाटप
छगन भुजबळ यांचा अमृत महोत्सवी सोहळा विविध सामाजिक उपक्रमातून साजरा होत असताना आज त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच जागतिक अंध दिनाच्या पार्श्वभूमीवर अंध बांधवाना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त युवक राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा विशेष सत्कार
छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पारंपारिक ढोल ताश्याच्या गजरात आणि फटाके वाजवत जल्लोषात स्वागत केले. यावेळी त्यांच्यावतीने पैठणी फेटा बांधून २५ फुट हार घालत विशेष सत्कार केला. तसेच यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने विठ्ठल रुखमाई यांची प्रतिकृती भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह कुटुंबातील सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस आणि समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
