श्री बाळेश्वर विद्यालयात जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

संगमनेर प्रतिनिधी
श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार या विद्यालयात जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सुनिल साबळे,जेष्ट शिक्षक श्री भारत हासे,गंगाधर पोखरकर ,नारायण डोंगरे,अशोक जाधव,रघुनाथ मेंगाळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक तुकाराम कोरडे बोलत होते.बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी सुगाना व करमी या आदिवासी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्म गाव उलीहातू हे रांची जवळ आहे.
बिरसाचे आई-वडील शेतमजूर होते.घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता.
तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन-कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपारिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुध्द असंतोष निर्माण झाला होता.
१८९४ साली बिहार मध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले.
तश्यातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागिरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता.
याविरुध्द बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध लढा पुकारला. त्यासाठी त्यांनी एक घोषवाक्य दिले. एकमेकांना भेटल्यावर आदरभाव व्यक्त करण्यासाठी ‘उलगुलान’ म्हणावे असे सांगितले.
१८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपारिक शास्राद्ववारे अनेक लढाया केल्या. ब्रिटिशांना जेरीस आणले; परंतु ब्रिटीशांच्या आधुनिक शास्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही.
१८९८ मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे ४०० आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले.
आपल्या २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटीत केले. ब्रिटीश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे.
सन १९०० मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटीश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली.बिरसा मुंडानां चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे ९ जून १९०० रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले.
या वीराने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना ‘जननायक’ हा किताब बहाल केला.
या कार्यक्रम प्रसंगी हेमंत बेनके,विश्वास पोखरकर ,बाळासाहेब डगळे, चेतन सरोदे,संजय ठोकळ श्रीकृष्ण वर्पे,सोमनाथ सलालकर,विठ्ठल फटांगरे,जयराम राहणे,सोमनाथ गोसावी,भाऊराव धोंगडे,मनोहर कचरे,मंगेश औटी,गणपत औटीआदी उपस्थित होते.सुत्रसंचलन हेमंत बेनके यांनी केले तर आभार रघुनाथ मेंगाळ यांनी मानले.