इतर

जवळे कडलग येथे व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन, डॉ. गौराम बिडवे करणार समुपदेशन

राजूर /प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे ममता मंगल कार्यालयात सोमवार दि.२८ नोव्हेंबर पासून ते मंगळवार दि.३ डिसेंबर पर्यंत व्यसनमुक्तीचे सहा दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते डॉ. गौराम बिडवे यांच्या “अपूर्व आनंद मार्ग”या उपक्रमा अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दारूचे व्यसन म्हणजे एक प्रकारची कीड असून संपूर्ण समाजव्यवस्था या किडीने पोखरून टाकली आहे.या व्यसनाने आज हजारो लोकांचे आयुष्य उध्वस्त झालेले आहे.अशाच व्यसनाधीन होऊन निराशेच्या खाईत गेलेल्या तरुणांसाठी राजुरचा कर्मयोगी मात्र रात्रंदिवस झटत आहे.व्यसनमुक्तीचा विडा उचललेल्या या धेय्यवेड्या अवलिया डॉक्टरने आजवर हजारो व्यसनाधीन तरुणांच्या जिवनात नवंसंजीवनी फुलवली आहे.अनेक जणांचे विस्कटलेले संसार पुन्हा सावरले आहेत.
डॉ बिडवे यांचे हे सामाजिक कार्य राजूर मधील गोधाम व्यसन मुक्ती केंद्रा व्दारे हे अविरत सुरू आहे.
शाळा,महाविद्यालये,सामाजिक संस्था,सार्वजनिक कार्यक्रम याद्वारे विविध शिबिरांचे आयोजन करून डॉ.बिडवे यांनी आजवर जवळ जवळ पंधरा हजार तरुणांना व्यसन मुक्त केले आहे.डॉ.बिडवे यांची व्यसन मुक्तीची ही मोहीम पाहून आपल्या राज्यासह शेजारीलगुजरात,राजस्थान,आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील मोठा तरुण वर्ग व्यसन मुक्तीसाठी आकर्षित झाला आहे.
त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यातील विविध सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव करून सन्मानित केले आहे.व्यसन मुक्तीच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने देखील त्यांचा “राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
अशाच प्रकारच्या एका सहा दिवसीय व्यसनमुक्ती निवासी शिबिराचे आयोजन संगमनेर जवळील जवळे कडलग येथे सोमवार पासून आयोजित करण्यात आले आहे.
या निवासी शिबिरात डॉ.गौराम बिडवे यांच्यासह डॉ. तेजश्री बिडवे,डॉ.चव्हाण व इतर सहकारी मार्गदर्शन करणार आहेत,तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे जेष्ठ प्रशिक्षक सुभाष पारासर,प्राध्यापक धोंडीभाऊ गुंजाळ,बाबासाहेब म्हस्के आणि त्यांचे इतर सहकारी देखील प्रशिक्षण देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सहा दिवसीय व्यसन मुक्तीच्या या शिबिरात प्रामुख्याने योगासने, प्राणायाम, ध्यान, ज्ञान, संगीत, सत्संग व भजन अशा विविध उपक्रमातून अत्यंत प्रेममयी मार्गाने आपल्या मनातील दारूचे व्यसन कायमस्वरूपी बाहेर काढले जाणार आहे. प्रसंगानुरूप व आपल्या प्रकृतीनुसार थोडीफार आयुर्वेदिक औषधी देखील दिली जाणार आहेत.आपली प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी ही औषधी दिली जाणार आहेत. या शिबिरात व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते गुरुवर्य डॉ. गौराम बिडवे व सर्व सहकारी २४ तास आपल्या सोबत निवासी राहणार आहेत. आपल्या निवासाची व भोजनाची व्यवस्था शिबिराच्या ठिकाणी केलेली आहे. ज्यांना आपली दारू पिण्याची सवय कायमची मोडून, दारूचे व्यसन कायमचे आपल्या आयुष्यातून हद्दपार करायचे आहे अशा सर्वांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सोमवार दि.२८ रोजी दुपारी एक वाजता ममता मंगल कार्यालय जवळे कडलग येथे उपस्थित राहावे लागणार आहे.
सदर शिबिरात सहभागी होणाऱ्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.शिबिराला येताना प्रत्येकाने आपले दैनंदिन कपडे,टूथ ब्रश,साबण आणि अंथरूण व पांघरण्याचे कपडे घेऊन येण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे,तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी शिबिराचे आयोजक,समाजसेवक डी एम लांडगे यांच्याशी ९८५०६९५०४९ या नंबरवर संपर्क करण्याचे सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button