१ कोटी ५५ लाख कुटुंबियांना आनंदाचा शिधा वाटप – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

विधानपरिषद लक्षवेधी प्रा राम शिंदे
यांनी घेतला चर्चेत सहभाग
दत्ता ठुबे
नागपूर– राज्य शासनाने दिवाश्रत प्राधान्य कुटुंब, अंत्योदय अन्न योजनेतंर्गत राज्यात आनंदाचा शिधा 100 रुपयात देण्याचा निर्णय घेतला. राज्यात आनंदाचा शिध्याचा 97 टक्के शिधापत्रिकाधारकांनी लाभ घेतला असून ही सर्व प्रक्रिया ई-लिलावाद्वारे झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधानपरिषदेत दिली. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आनंदाचा शिधा याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, दिवाळीच्या तोंडावर गरिबांना चणाडाळ, साखर, रवा आणि पामतेल एक किलोप्रमाणे पोहोचवण्यासाठी त्वरित ई-लिलाव प्रक्रिया राबविली. यामध्ये 9 अर्जापैकी 6 संस्थांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने ई-लिलावात भाग घेतला होता. ही प्रक्रिया पारदर्शक आणि नि:पक्ष पार पाडली. यामध्ये कोणतीही अनियमितता झाली नाही. त्यावेळी असलेल्या बाजारभावानेच चारही पदार्थ संस्थेने खरेदी केले. अत्यावश्यक बाब असल्याने एनईएमएल या पोर्टलच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया पार पाडली आहे.
आतापर्यंत एक कोटी 55 लाख 43 हजार 44 गरीब कुटुंबाना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले असून उर्वरित वाटप ज्यांना मिळाले नसेल त्यांना वाटप करण्यात येईल, असेही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य ॲड. मनीषा कायंदे, सचिन अहिर, प्रा. राम शिंदे यांनी सहभाग घेतला.