स्व. समाजभूषण विष्णू शेठ शिंदे यांचे १३ वे पुण्यस्मरण

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
१ जानेवारी २०२३ रोजी कर्जुले हरेश्वर ता. पारनेर येथील समाजभूषण स्व. विष्णू शेठ पाटीलबुवा शिंदे यांचे १३ वे पुण्यस्मरण आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे,विभाग प्रमुख लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ तथा पार्श्वगायक, बाजीराव मस्तानी फेम यांचे व्याख्यान आयोजित केले होते. स. ८ वा. हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कर्जुले हरेश्वर विद्यालयातील मुलांची प्रभात फेरी निघाली.
यावेळी बोलताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले, विष्णूशेठ आप्पा यांना जाऊन १३ वर्षे झाली. दरवर्षी शिंदे परिवार त्यांचे पुण्यस्मरण घेतात. अतिशय अडचणीच्या गरीबीच्या परिस्थितीतून मुंबई येथे जायचे प्रसंगी शारीरिक कष्टाचे काम करायचे आणि त्यांनी लौकिकास पात्र असा “विष्णू ग्रुप ट्रान्सपोर्टचा” व्यवसाय उभा केला.त्या व्यवसायाच्या माध्यमातून या परिसरातील प्रत्येक मनुष्य जो कोणी अडचणीत आहे त्याला मुंबईला बोलावून घ्यायचे त्यांना कामधंद्यास लावायचे असी अनेक माणसे आप्पांनी त्यांच्या पायावर उभी केली. त्यांचे संपूर्ण जीवन साधी राहणी परंतु उच्च विचारसरणी अशी होती. आपल्या गावाला काहीतरी करत राहण्याची त्यांची तळमळ असायची.श्री हरेश्वर विद्यालयाची स्थापना त्यांनीच केली. अतिशय मनमोकळेपणाने दान करणारे हे दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे शिंदे कुटुंब तशाच प्रकारे आदर्शवत जीवन जगत आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. कर्जुले हरेश्वर मध्ये विकासाची कामे व्हावी यासाठी त्यांचा माजी आमदार विजयराव औटी यांच्याकडे आग्रही मागणी असायची. त्यांच्या माध्यमातून या गावात मोठी विकास कामे झाली. मला जिल्हा परिषद मध्ये बांधकाम समितीत काम करण्याची संधी मिळाली आणि आप्पांची आग्रही मागणी असलेला शिंदे पेठ रस्त्यासाठी माझ्या माध्यमातून ९० लक्ष रुपये रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी दिले व आज या रस्त्यावरील सी.डी. वर्क साठी २५ लक्ष रुपयांचा निधी देऊन त्याचे या पुण्यस्मरणानिमित्त भूमिपूजन करण्याचे भाग्य मला मिळाले.

- समाजभूषण स्व. विष्णू शेठ शिंदे यांचा जन्म २० जून १९४३ रोजी झाला. अवघे ७ पर्यंत शिक्षण घेतलेले आप्पा मुंबई येथे जाऊन धोबीतलाव येथे राहत होते. आपल्या वडिलांबरोबर स्वतः हातगाडी ओढण्याचे काम त्यांनी केले. त्यांची चिकाटी पाहून क्लिअरिंग शिविंग एजन्सी कंपनीमध्ये विश्वास संपादन करुन गोदी मध्ये मुकादामाचे काम त्यांना मिळाले. पुढे कष्टाने त्यांनी आपले जीवनच बदलले आणि स्वतः त्यांनी “विष्णू अँड कंपनी” स्थापन करून आपली कंपनी खूप मोठ्या प्रमाणात चालू केली. कर्णासम दानशूर व्यक्तिमत्व असलेले आप्पा सर्वच दान सर्वांपर्यंत पोहोचत असे नाही. पण अन्नदान हे सर्वांपर्यंत पोहोचावे आणि अन्नदानाची ख्याती संपूर्ण पंचक्रोशीत वाखण्यासारखी आहे. अनेक लग्न सोहळे आणि धार्मिक उत्सवात आप्पांनी प्रचंड समुदायाला कधी आंबेरस तर कधी पुरणपोळी असे अनेक पदार्थाचे अन्नदान केले. आपल्या परिसरातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कर्जुले हरेश्वर येथे हरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ज्या परिस्थितीतून ते मोठे झाले ती परिस्थिती ते कधीच विसरले नाहीत. निळी हाफ पॅन्ट व खाका शर्ट आणि वरती सफेद टोपी या राहणीमानात ते नेहमी समाजामध्ये वावरत आणि तोच पेहराव त्यांनी शेवटपर्यंत जोपासला व समाजाला नवीन दिशा देण्याचे काम त्यांनी केले. आपला हात जगन्नाथ याप्रमाणे त्यांनी स्वकर्तुत्वाला सर्व संपन्नता प्राप्त केली. असे हे आप्पा पारनेर तालुक्याचे भूषण १ जानेवारी २०१० रोजी आपल्यातून निघून गेले

या कार्यक्रमास सिताराम खिलारी सर, नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजीराव शिर्के, हरेश्र्वर शिक्षण मंडळ अध्यक्ष रामदास शिंदे, उपतालुका प्रमुख पंढरीनाथ उंडे, सरपंच संजीवनी आंधळे, माजी सरपंच साहेबराव दादा वाफारे, संतोष आंधळे, उपतालुका प्रमुख सुनीताताई मुळे, उपसरपंच मिनीनाथ शिंदे, संदीप आंधळे, अमोल आंधळे, हरेश्र्वर प्रसारक मंडळ संचालक, हरेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद अनेक मान्यवर उपस्थित होते.समितीचे अध्यक्ष भास्कर उंडे हेही होते.